टी20 वर्ल्डकपपूर्वी किवीला मोठा झटका! स्टार वेगवान गोलंदाज संघाबाहेर

पुरूषांचा टी२० विश्वचषक सुरू होण्याआधीच संघांना धक्के बसण्याचे सुत्र सुरू आहे. अनेक संघांचे खेळाडू दुखापतग्रस्त झाले असून ते काही सामन्यांना मुकणार आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सचा समावेश आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेचे दोन खेळाडूही दुखापतीमुळे विश्वचषकाच्या संघाबाहेर झाले आहेत. त्यात आता न्यूझीलंड संघाची भर पडली आहे. त्यांचा एक मुख्य गोलंदाज दुखापतीमुळे आगामी टी२० विश्वचषकातून बाहेर झाला आहे.

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ऍडम मिल्ने हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे टी२० विश्वचषकातून बाहेर झाला आहे. न्यूझीलंडने आधीच कायले जॅमिसनला संघात राखीव खेळाडू म्हणून घेतले होते. त्यासाठी त्याला भारताविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी संघातही घेतले आहे.

मिल्नेला एसए२० (दक्षिण आफ्रिका) लीगमध्ये दुखापत झाली होती. तो यातून सावरेल अशी शक्यता न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक रॉब वॉल्टर यांनी दर्शवली होती. अधिक तपास केला असता त्याची दुखापत गंभीर असल्याचे दिसले. तसेच तो संघासाठी लवकर फिट होणार नाही. यामुळे तो या स्पर्धेतून बाहेर झाला आहे.

“मिल्नेने इस्टर्न केप सनरायजर्सकडून ८ सामन्यांत खेळताना उत्तम कामगिरी केली होती. याबरोबरच त्याने विश्वचषकासाठी चांगली मेहनतही घेतली होती. तो संघात नाही हे दुर्दैवाचे असून तो लवकर बरा व्हावा हीच इच्छा”, असे वॉल्टर म्हणाले. तसेच त्यांनी संघात जॅमिसन असल्याने थोडा धीर असल्याचेही म्हटले.

“भारताच्या दौऱ्यात संघात कायले असल्याची बाब आमच्यासाठी चांगली ठरली. आम्ही लवकरच विश्वचषकासाठी राखीव खेळाडू जाहीर करू”, असेही वॉल्टर पुढे म्हणाले.

टी२० विश्वचषक येत्या ७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. ह्या स्पर्धेचे यजमानपद भारत आणि श्रीलंकेला मिळाले आहे.

Comments are closed.