पाकची कारस्थानं सुरुचं, ICC ची आर्थिक कोंडी करण्याचा प्लॅन, नक्वींची खेळाडूंसोबत चर्चा सुरु

नवी दिल्ली : टी 20 वर्ल्ड कपमधील आमचे सामने श्रीलंकेत खेळवा अशी मागणी करणाऱ्या बांगलादेशची आयसीसीनं हकालपट्टी केली आहे. बांगलादेशच्या जागी स्कॉकटलंडला वर्ल्ड कपमध्ये स्थान देण्यात आलं. आयसीसीच्या या निर्णयाचा पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं विरोध करत त्यांनी बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती. मात्र, आयसीसीच्या इशाऱ्यानंतर पाकिस्ताननं अखेर त्यांचा संघ जाहीर केला. बांगलादेश टी20 वर्ल्ड कपबाहेर गेल्यानं पाकिस्तान नाराज आहे. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं आता एक नवा डाव खेळण्याची तयारी केली आहे. भारताविरुद्धचा 15 फेब्रुवारीचा सामना न खेळण्याचा निर्णय पाकिस्तान घेऊ शकतं. या निर्णयामुळं आयसीसीचं मोठं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानची टी 20 वर्ल्ड कपच्या निमित्तानं नाटकं सुरु आहेत. जिओ सुपरच्या रिपोर्टनुसार पाकिस्तान टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकू शकते. याबाबत पीसीबीकडून गांभीर्यानं विचार केला जात आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅच 15 फेब्रुवारीला कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. पाकिस्तान बहिष्काराच्या माध्यमातून आयसीसीचा विरोध करण्याच्या तयारीत आहे.

भारताविरुद्धच्या सामन्यावर पाक बहिष्कार टाकणार?

सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्ड विरोध करण्याच्या अनेक पर्यायांवर विचार करत आहे. पाकिस्तान टी  20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी होईल. मात्र, भारताविरोधात न खेळल्यास त्यांचे दोन गुण कमी होतील. मात्र, आयसीसीचं मोठं नुकसान होऊ शकतं. पीसीबीचे अध्यक्ष मोहसी नक्वी टीमसोबत भेटून पुढील नियोजनावर चर्चा करणार आहेत. नक्वी यांनी टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्याबाबत अंतिम निर्णय पाकिस्तान सरकार घेऊल असं म्हटलं होतं.

पाकिस्तानचा टी 20 वर्ल्ड कपमधील पहिला सामना 7 फेब्रुवारीला नेदरलँडस विरुद्ध होणार आहे. यानंतर 10  फेब्रुवारीला पाकिस्तान आणि अमेरिका आमने सामने येतील. 15 फेब्रुवारीला भारताविरुद्ध पाकिस्तानचा सामना आहे. तर, 18 फेब्रुवारीला पाकिस्तान आणि नामिबिया यांच्यात लढत होईल. सुपर 8 च्या मॅचेस 21 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान होणार आहेत. उपांत्य फेरीचे सामना 3 आणि 5 मार्च तर फायनल 8 मार्चला होईल. पाकिस्तान अंतिम सामन्यात पोहोचल्यास फायनल कोलंबोत होईल. अन्यथा फायनल अहमदाबादला होणार आहे.

पाकिस्तानचं नेतृत्व सलमान अली आगा करणार आहे. खराब फॉर्ममध्ये असलेल्या बाबर आझमवर व्यवस्थापनानं विश्वास ठेवला आहे. टीममध्ये शादाब खान, ख्वाचा नफाय, उस्मान तारिक यांचा समावेश आहे. पाकिस्तानचे सर्व सामने कोलंबोत होणार आहेत.

टी20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ : सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, बाबर आझम, फहीम अशरफ, फखर जमान, ख्वाजा नफाय (विकेटकीपर), मोहम्मद नवाज, मोहम्मद सलमान मिर्जा, नसीम शाह, साहिबजादा फरहान (विकेटकीपर), सॅम अयूब, शाहीन शाह अफरीदी, शादाब खान, उस्मान खान (विकेटकीपर) आणि उस्मान तारिक

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.