IND vs SA: टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनवर रवी शास्त्रींचे मोठं विधान! भारतीय संघाचं टेन्शन वाढणार

भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड कप 2026 (icc T20 international world cup 2026) मध्ये आपला विजयाचा धडाका कायम ठेवला आहे. सलग 4 सामने जिंकून भारताने दिमाखात ‘सुपर-8’ मध्ये प्रवेश केला आहे. आता 22 फेब्रुवारीला भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात जोरदार टक्कर होणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघ फॉर्मात असून एकही सामना न हरता आमनेसामने येत आहेत. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल आपली मते मांडली आहेत.

‘आयसीसी रिव्ह्यू’वर बोलताना शास्त्री म्हणाले, भारतासाठी सर्वात जमेची बाजू म्हणजे प्रत्येक सामन्यात कोणत्या ना कोणत्या खेळाडूने मॅचविनिंग कामगिरी केली आहे. इशान किशन असो किंवा पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादव, प्रत्येकाने योगदान दिले आहे. तिलक वर्मानेही चांगली सुरुवात केली आहे, पण मला वाटते की त्याची सर्वोत्तम खेळी अजून येणे बाकी आहे.

अभिषेक शर्मा सलग तीन सामन्यांत शून्यावर बाद झाला आहे. यावर शास्त्रींनी मिश्किलपणे पण सकारात्मक टिप्पणी केली. ते म्हणाले, अभिषेक शर्मा तीन सामन्यांत शून्यावर बाद होणे, ही सुद्धा एक प्रकारे सकारात्मक गोष्ट आहे. कारण, त्याने आपली सर्वोत्तम खेळी स्पर्धेच्या सर्वात महत्त्वाच्या (नॉकआउट) वेळेसाठी राखून ठेवली आहे, असे आपण म्हणू शकतो. इतर संघ नक्कीच काळजीत असतील की अभिषेकने अजून मोठी धावसंख्या उभारलेली नाही (आणि तो कधीही फॉर्ममध्ये येऊ शकतो).

भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवनेही अभिषेकवर विश्वास दाखवला असून, आगामी सामन्यात तो आपल्या बॅटिंगची ताकद दाखवेल अशी आशा व्यक्त केली आहे. शास्त्रींच्या मते, भारत आणि दक्षिण आफ्रिका या स्पर्धेतील सर्वात मजबूत टीम्स आहेत. ते पुढे म्हणाले, दोन्ही संघांकडे फलंदाजीमध्ये चांगली खोली (Depth) आहे. त्यामुळे 22 तारखेला होणारा हा सामना अत्यंत थरारक असेल. या स्पर्धेतील दोन सर्वात शक्तिशाली संघ एकमेकांशी भिडणार आहेत.

Comments are closed.