“आम्हाला बांग्लादेशबाबत सहानुभूती”, स्कॉटलंड क्रिकेटच्या अध्यक्षांचे वक्तव्य
क्रिकेटविश्वात वरिष्ठ पुरूष संघाचा टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धा सुरू होणार आहे. ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेचे यजमानपद गतविजेत्या भारताबरोबर श्रीलंकेला मिळाले आहे. ही स्पर्धा सुरू होण्याला काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना बांग्लादेश आणि पाकिस्तान संघांनी या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांग्लादेशचे सरकार आणि क्रिकेट बोर्डने ठोस कारण देत या स्पर्धेतून माघार घेतली. त्यांंच्याजागी स्कॉटलंड यामध्ये खेळणार असेही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केले आहे. त्यांना मिळालेली ही संधी आणि बांग्लादेशबाबत स्कॉटलंड क्रिकेटच्या अध्यक्षांंनी त्यांचे मत व्यक्त केले आहे
स्कॉटलंड क्रिकेटचे अध्यक्ष ट्रुडी लिंडब्लेड म्हणाले, “अर्थातच, आम्हाला अशा प्रकारे विश्वचषकात जायचे नव्हते. त्यासाठी एक पात्रता प्रक्रिया असते आणि आम्ही ज्या पद्धतीने विश्वचषकासाठी पात्र ठरलो आहोत, त्या पद्धतीने कोणीही पात्र ठरू इच्छित नाही किंवा त्यात सहभागी होऊ इच्छित नाही. आमच्या सहभागामुळे ही निश्चितच एक अनोखी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि आम्हाला बांग्लादेशच्या खेळाडूंबद्दल सहानुभूती वाटते.”
“लोक आमच्या या विश्वचषकात खेळण्याबाबत काय म्हणत आहेत याकडे आम्ही दुर्लक्ष करत असून ते त्यांचे मत आहे. आम्ही जागतिक क्रमवारीत १४व्या स्थानावर आहोत. आम्हीही एक मजबूत संघ असून वर्षभरापासून आम्ही सातत्याने खेळत आहोत,” असेही ते पुढे म्हणाले.
स्कॉटलंडने आगामी टी२० विश्वचषकासाठी संघ जाहीर केला असून ते या स्पर्धेच्या पहिल्या हंगामातही खेळले आहेत. तसेच त्यांचा कर्णधार रिची बेरिंग्टनचा हा कारकिर्दीतील सहावा टी२० विश्वचषक असणार आहे. तो २००७, २००९, २०१६, २०२१, २०२२ आणि २०२४च्या विश्वचषकासाठी संघात होता.
या स्पर्धेत स्कॉटलंड क गटात आहे. त्यामध्ये इंग्लंड, इटली, नेपाळ आणि वेस्ट इंडिजचा सहभाग आहे. त्यांचा या स्पर्धेतील पहिला सामना ७ फेब्रुवारीला वेस्ट इंडिजविरुद्ध कोलकाताच्या इडन गार्डनवर होणार आहे.
टी२० विश्वचषकासाठी स्कॉटलंडचा संघ-
रिची बेरिंग्टन (कर्णधार), टॉम ब्रूस, मॅथ्यू क्रॉस, ब्रॅडली करी, ऑलिव्हर डेविडसन, ख्रिस ग्रीव्ह्स, झैनुल्ला एहसान, मायकेल जोन्स, मायकेल लीस्क, फिनले मॅकक्रेथ, ब्रँडन मॅकमलेन, जॉर्ज मुन्से, सफयान शरीफ, मार्क वॅट, ब्रॅडली व्हील.
Comments are closed.