T20 WC26: गांगुलीने सेमीफायनलआधी भारताला केले सावध! कोणाबद्दल म्हणाला, “आता ड्रॉप करू नका नाहीतर…”

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यानेही संजू सॅमसनच्या नाबाद ९७ खेळीचे कौतुक केले आहे. तसेच त्याच्याबद्दल भारतीय संघाला एक सल्लाही दिला आहे. टी२० विश्वचषक २०२६मध्ये उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. गांगुलीने हा सामना आव्हानात्मक असणार असे म्हटले आहे.
आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मध्ये भारत आणि वेस्ट इंडिज रविवारी (१ मार्च) सुपर-८ सामन्यात समोरा-समोर आले. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळला गेला. या सामन्याआधी भारताची या मैदानावरील वेस्ट इंडिजविरुद्धची टी२० कामगिरी उत्तम राहिली होती, मात्र टी२० विश्वचषकात वेस्ट इंडिज नेहमीच भारताला नडला आहे. यामुळे त्या सुपर-८च्या सामन्यात नेमके काय होईल याची चिंता होती.
या सामन्यात भारताला १९६ धावांचे लक्ष्य मिळाले होते. धावांचा पाठलाग करताना भारताचे फलंदाज एका मागोमाग बाद होत गेले. अशा स्थितीत संजूने संयमी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. त्याने ५च चेंडूत १२ चौकार आणि ४ षटकार मारले. त्याचा या स्पर्धेत हा तिसराच सामना होता आणि त्याने संघाच्या विजयाच महत्वाची भुमिका पार पाडली. यामुळे चोहोबाजूंनी त्याचे कौतुक केले जात आहे. त्याच्या या कामगिरीबाबात गांगुली यांनी निवडकर्त्यांना एक संदेश दिला आहे.
गांगुलीने म्हटले, “सॅमसन हा एक उत्तम खेळाडू आहे. त्याला भारताच्या मर्यादित षटकांच्या संघात सतत खेळवले पाहिजे. तो एक असा खेळाडू आहे जो क्रिजवर अधिक काळ टिकू शकतो आणि विरोधी संघांना त्रास देऊ शकतो. त्याने दबावाच्या स्थितीत उत्तम कामगिरी केली, यावरून त्याच्यामध्ये किती परिपक्वता आहे हे सिद्ध होते.” यावरून गांगुलीने एकंदरीत संजूला आता बाकावर बसवू नका, असा ईशारा दिला आहे.
या स्पर्धेत भारत पुन्हा एकदा इंग्लंडशी दोन हात करणार आहे. उपांत्य फेरीचा हा सामना ५ मार्चला वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हे दोन्ही संघ २०२२ आणि २०२४मध्ये उपांत्य फेरीत समोरा-समोर आले होते. त्यामध्ये २०२२मध्ये इंग्लंडने आणि २०२४मध्ये भारताने बाजी मारली आहे. तसेच टी२० विश्वचषकात हे दोघे ५ वेळा भिडले असून ३ सामने भारताने आणि २ सामने इंग्लंडने जिंकले आहेत.
वरील आकडेवारीवरून दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने मुंबईवर कोणाचे पारडे जड ठरेल हे पाहणे चुरशीचे ठरेल
वेस्ट इंडिजच्या तुलनेत इंग्लंड अधिक मजबूत आणि संतुलित आहे. वानखेडेवरील कामगिरी पाहून भारताला त्याच्या रणनीतीमध्ये बदल करावा लागेल. ज्या संघाला लवकर परिस्थितीची जाणीव होईल तो संघ जिंकेल, असे वक्तव्य करत गांगुलीने इंग्लंडविरुद्धच्या सामन्याआधी भारताला सावध केले आहे.
Comments are closed.