झिम्बाब्वेच्या विजयाने ग्रुप-बी चं गणितं बदललं; ऑस्ट्रेलियाचं वर्ल्ड कपमधील आव्हान संपणार?

13 फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला 23 धावांनी हरवून सर्वांनाच चकित केले. या पराभवामुळे ऑस्ट्रेलियन संघाचे या स्पर्धेतील आव्हान आता धोक्यात आले आहे.

झिम्बाब्वेकडून मिळालेल्या या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला सुपर-8 मध्ये पोहोचण्यासाठी आता मोठे कष्ट घ्यावे लागणार आहेत. ऑस्ट्रेलियाला ग्रुप स्टेजमध्ये अजून दोन सामने खेळायचे आहेत.16 फेब्रुवारीला त्यांचा सामना यजमान श्रीलंकेविरुद्ध होईल, जो त्यांच्यासाठी अत्यंत कठीण असणार आहे. जर ऑस्ट्रेलिया श्रीलंकेविरुद्धचा सामना हरला, तर त्यांचे वर्ल्ड कपमधील आव्हान तिथेच संपेल. त्यांचा शेवटचा ग्रुप सामना 20 फेब्रुवारीला ओमानविरुद्ध होईल.

ऑस्ट्रेलियाला आता फक्त सामने जिंकून चालणार नाही, तर आपला नेट रनरेट (Net Run Rate) सुधारण्यासाठी मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. सध्या 2 सामन्यांनंतर ऑस्ट्रेलियाचे 2 गुण असून त्यांचा रनरेट 1.100 आहे. ऑस्ट्रेलियाचे भवितव्य आता केवळ स्वतःच्या कामगिरीवरच नाही, तर इतर सामन्यांवरही अवलंबून आहे. श्रीलंका विरुद्ध झिम्बाब्वे (19 फेब्रुवारी) या सामन्याचा निकाल ग्रुप-बी मधील समीकरणे बदलू शकतो. जर ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला हरवले आणि त्यानंतर झिम्बाब्वेनेही श्रीलंकेला हरवले, तर ऑस्ट्रेलियाचा मार्ग सोपा होईल. मात्र, श्रीलंकेने आपले दोन्ही सामने जिंकले, तर ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाहेर पडेल.

झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवून सुपर-8 च्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे. त्यांना त्यांचा पुढचा सामना 17 फेब्रुवारीला आयर्लंडविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना जिंकल्यास त्यांचे सुपर-8 मधील स्थान जवळपास निश्चित होईल.

Comments are closed.