T20 World Cup: सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणारे टॉप-4 खेळाडू कोण? पाहा यादी….

भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 ची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून मैदानात उतरणार आहे. आतापर्यंत एकूण 9 वेळा टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन झाले असून भारत, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या तीन देशांनी प्रत्येकी दोनदा जेतेपद पटकावले आहे. यंदा भारताला आपल्या घरच्या मैदानावर तिसरे विजेतेपद मिळवण्याची संधी आहे.

वर्ल्ड कपमध्ये संघाच्या यशात वैयक्तिक कामगिरी महत्त्वाची ठरते. शानदार खेळी करणाऱ्या खेळाडूंना ‘मॅन ऑफ द मॅच’ (सामनावीर) पुरस्कार दिला जातो. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक वेळा सामनावीर जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली अव्वल स्थानावर आहे.

विराट कोहली- सर्वाधिक 8 वेळा सामनावीर

भारतीय स्टार फलंदाज विराट कोहलीने 2012 ते 2024 या कालावधीत एकूण 7 टी20 वर्ल्ड कप खेळले. या काळात त्याने 35 सामने खेळले असून 8 वेळा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकला आहे. निर्णायक सामन्यांतील त्याच्या खेळीमुळे भारताला अनेकदा विजय मिळाला आहे.

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर चार खेळाडू संयुक्तपणे आहेत. वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल, श्रीलंकेचा महेला जयवर्धने, ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन आणि अ‍ॅडम झांपा यांनी प्रत्येकी 5 वेळा सामनावीर पुरस्कार जिंकले आहेत. गेलने 33, जयवर्धनेने 31, वॉटसनने 24 तर झांपाने 21 सामने खेळले आहेत.

तिसऱ्या क्रमांकावर एबी डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका), तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका), शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान) आणि शाकिब अल हसन (बांगलादेश) यांचा समावेश आहे. या सर्वांनी 4-4 वेळा MOTM पुरस्कार पटकावले आहेत.

या यादीतील चौथ्या स्थानावर सहा खेळाडू आहेत. श्रीलंकेचा असालंका, भारताचा आर. अश्विन, इंग्लंडचा जोस बटलर, सनथ जयसूर्या, एंजेलो मॅथ्यूज आणि केविन पीटरसन यांनी प्रत्येकी 3 वेळा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकले आहेत.

Comments are closed.