वर्षभर सोशल मीडियापासून दूर राहिल्यानंतर तापसी पन्नूचे पुनरागमन; म्हणाली या निर्णयाची किंमत मोजावी लागली…
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. जवळपास एक वर्ष सोशल मीडियापासून दूर राहिल्यानंतर तिने आता डिजिटल विश्वात पुनरागमन केले आहे. परत येताच तिने चाहत्यांशी संवाद साधत, तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांना कोणत्या प्रकारचा कंटेंट पाहायला आवडेल, असा प्रश्न विचारला आहे. अलीकडेच एका मुलाखतीत तापसीने सोशल मीडियापासून दूर राहण्यामागील कारण स्पष्ट केले. तिच्या मते, सेलिब्रिटींवर सतत ऑनलाइन सक्रिय राहण्याचा दबाव वाढत चालला आहे. या सततच्या स्पर्धेमुळे आणि ट्रेंडच्या मागे धावण्याच्या संस्कृतीमुळे ती मानसिकदृष्ट्या थकली होती. त्यामुळे तिने काही काळासाठी सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर राहण्याचा निर्णय घेतला.
तापसीने सांगितले की, हा निर्णय तिने कोणत्याही प्रसिद्धीसाठी घेतला नव्हता. स्वतःसाठी वेळ मिळावा आणि खऱ्या आयुष्याचा अनुभव घेता यावा, यासाठी तिने फोनमधून सोशल मीडिया ॲप्सदेखील हटवून टाकली होती. तिच्या मते, प्रत्येक क्षणी नोटिफिकेशन्स तपासण्यापेक्षा प्रत्यक्ष आयुष्य जगणे अधिक महत्त्वाचे वाटू लागले होते. मात्र, या निर्णयाचा व्यावसायिक परिणामही तिला सहन करावा लागला. तापसीच्या म्हणण्यानुसार, अनेक ब्रँड्सना सतत सोशल मीडियावर दिसणारे आणि सक्रिय असणारे कलाकार अधिक पसंत असतात. कमी पोस्ट केल्यामुळे काही ब्रँड्सनी तिच्यासोबत काम करण्यास अनुत्सुकता दाखवली. यावर प्रतिक्रिया देताना तापसीने प्रश्न उपस्थित केला की, कलाकारांनी केवळ मार्केटिंगसाठी स्वतःचे व्यक्तिमत्त्व बदलणे योग्य आहे का?
सध्या तापसी तिचा पती कुटुंबीयांसोबत डेन्मार्कमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तिथे ती साधे आणि निवांत जीवन जगत असून स्वतः स्वयंपाक करणे, बागकाम, व्यायाम करणे अशा दैनंदिन गोष्टींमध्ये वेळ घालवत आहे. कामाच्या आघाडीवर तापसी लवकरच वो लडकी हैं कहा या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमामध्ये तिच्यासोबत प्रतीक गांधी, प्रतीक बब्बर आणि हरलीन सेठी महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
Comments are closed.