ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात पार पडली वन्यजीव गणना

राज्यातील प्रादेशिक आणि राखीव जंगलांमध्ये दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री मचाण वन्यजीव गणना केली जाते. हजारोच्या संख्येत वन्यजीवप्रेमी खास तयार केलेल्या पाणवठ्याजवळील उंच मचाणीवर बसून रात्रभर वन्यजीव आणि पक्षी यांचे मनसोक्त दर्शन घेतात. निसर्गानुभव या नावाने वनविभागाच्या वतीने हा उपक्रम आयोजित केला जातो. यासाठी आदल्या संध्याकाळी या सर्व वन्यजीवप्रेमींना त्यांच्या नियोजित मचाणीवर वनविभागाच्या वाहनाने सोडले जाते. यानंतर रात्रभर जंगलातील आवाज, जंगलाचा अनुभव जंगलातील सुगंध व वन्यजीवांचे दर्शन घेत, यासंबंधीची निरीक्षणे टिपत निसर्गानुभव पार पडते.
यंदाही चंद्रपूरच्या ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात सुमारे 100 हून अधिक मचाणी यासाठी तयार करण्यात आल्या होत्या. यंदा 4500 रुपये प्रति व्यक्ती एवढे शुल्क आकारल्याने ही गणना वादात सापडली होती. मात्र सशुल्क असूनही या वन्यजीव गणनेला मोठा प्रतिसाद मिळाला. फार पूर्वी या वन्यजीव गणनेचे मोठे महत्त्व होते. मात्र सध्या विविध प्रकारचे अधिक सक्षम तांत्रिक गणना प्रकार अस्तित्वात असल्याने ही गणना केवळ एक उपचार ठरली आहे. तरीही नव्या पिढीला रात्रभर एखाद्या उंच मचाणीवर बसून अनुभवलेले जंगल थ्रिल भावत असल्याने याला मोठा प्रतिसाद लाभला.
Comments are closed.