'जीएसटी सेव्हिंग फेस्टिव्हल' चा फायदा घ्या!

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात एक मोठी घोषणा केली. ‘जीएसटी बचत उत्सव’ 22 सप्टेंबर रोजी सूर्योदयापासून सुरू होईल. या कार्यक्रमाचा फायदा सर्वसामान्यांपासून ते व्यापारी आणि लहान दुकानदारांपर्यंत सर्वांना होईल, असे पंतप्रधानांनी सांगितले. जीएसटी प्रणालीतील बदल ही केवळ कर सुधारणा नाही तर स्वावलंबी भारताच्या दिशेने एक क्रांतिकारी पाऊल असल्याची घोषणाही त्यांनी याप्रसंगी केली.

‘जीएसटी 2.0’ची अंमलबजावणी होण्याच्या पूर्वसंध्येला रविवारी पंतप्रधान मोदींनी 20 मिनिटांच्या आपल्या भाषणात जनतेला स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्याचे आणि परदेशी उत्पादनांवरील अवलंबित्व कमी करण्याचे आवाहन केले. नवीन जीएसटी सुधारणा नागरिकांच्या खिशात 2.5 लाख कोटी रुपयांहून अधिक बचत करेल, असा दावाही त्यांनी केला. या माध्यमातून एमएसएमई आणि लघु उद्योगांना नवीन ऊर्जा मिळल्यामुळे भारताची आर्थिक रचना मजबूत होईल, असेही पंतप्रधानांनी सांगितले. आजपासून सुरू होणाऱ्या या उत्सवाचा देशवासियांनी लाभ उठवावा, असे प्रतिपादन करत पंतप्रधानांनी आपल्या संबोधनाला अवघ्या 20 मिनिटातच पूर्णविराम दिला.

पंतप्रधानांच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे

जीएसटी बचत उत्सव आजपासून : 22 सप्टेंबर रोजी सकाळी देशभरात ‘जीएसटी बचत उत्सव’ सुरू होईल. याचा थेट परिणाम सामान्य ग्राहकांवर होईल, कारण टीव्ही, रेफ्रिजरेटर, बाईक, स्कूटर आणि घरबांधणी यासारख्या दैनंदिन गरजांवरील कर कमी होतील. येत्या काळात नागरिकांना त्यांच्या आवडीच्या वस्तू परवडणाऱ्या किमतीत खरेदी करता येतील असे पंतप्रधानांनी सांगितले.

‘एक देश, एक कर’चे स्वप्न पूर्ण : 2014 पूर्वी देशाची कर रचना अत्यंत गुंतागुंतीची होती. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वस्तूंची वाहतूक करण्यासाठी अनेक कर भरावे लागत होते. यामुळे खर्च वाढल्यामुळे गरीब आणि सामान्य लोकांवर भार पडला. जीएसटी लागू झाल्यामुळे देश या कर सापळ्यातून मुक्त झाला असून ‘एक राष्ट्र, एक कर’चे स्वप्न पूर्ण झाल्याचे पंतप्रधान म्हणाले.

गरीब व मध्यम वर्गासाठी दुहेरी फायदा : गेल्या 11 वर्षांत अंदाजे 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर पडले आहेत. मध्यमवर्गाची आर्थिक स्थितीही सुधारली आहे. या वर्गाला आता प्राप्तिकर सवलतींचा फायदा होत आहे. त्याच वेळी, गरिबांना स्वस्त दरात वस्तू देखील मिळतील. जीएसटी आणि कर सुधारणा एकत्रितपणे गरीब आणि मध्यमवर्गासाठी दुहेरी लाभ देत राहतील, अशी हमी मोदींनी दिली.

आता फक्त 5 आणि 18 टक्के जीएसटी : जीएसटी रचनेत आता फक्त 5 टक्के आणि 18 टक्के हे दोन प्रमुख दर असतील. बहुतेक दैनंदिन वस्तू आणि अन्नपदार्थ करमुक्त असतील किंवा फक्त 5 टक्के कर आकारले जातील. पूर्वी 12 टक्के करांतर्गत येणाऱ्या 99 टक्के वस्तू आता 5 टक्के स्लॅबमध्ये समाविष्ट करण्यात आल्यामुळे ग्राहकांवरील भार लक्षणीयरीत्या कमी होईल.

जनतेला 2.5 लाख कोटींचा लाभ : नवीन कररचनेचा थेट फायदा देशातील नागरिकांना होईल. प्राप्तिक सवलती आणि जीएसटी सुधारणांसोबत एकत्रित केल्यास नागरिक 2.5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त बचत करतील. ह्याच पैशांचा वापर आपोआपच वाढवल्यामुळे खरेदी वाढून अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यात मोठी मदत होणार असल्याचे मोदींनी स्पष्ट केले.

एमएसएमई स्वावलंबी भारताचा कणा बनेल : सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) हे भारताचा कणा आहेत. जीएसटी दर कमी केल्याने आणि नियम सोपे केल्याने त्यांची विक्री वाढेल आणि कराचा भार कमी होईल. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न तेव्हाच साकार होईल जेव्हा एमएसएमई बळकट होतील, कारण हे क्षेत्र लाखो लोकांना रोजगार आणि देशाला स्वदेशी उत्पादने प्रदान करते, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

प्रत्येक घर, दुकान स्वदेशीचे प्रतीक बनावे : पंतप्रधानांनी स्वदेशीला जनचळवळ बनवण्याचे आवाहन करताना ‘गर्वाने म्हणा, मी स्वदेशी वस्तू वापरतो. अभिमानाने सांगा, मी स्वदेशी वस्तू खरेदी करतो आणि विकतो.’ असेही स्पष्ट केले. आपण प्रत्येक घर आणि प्रत्येक दुकान स्वदेशीने सजवले पाहिजे. आपण दररोजच्या परदेशी वस्तूंपासून स्वत:ला मुक्त केले पाहिजे. मेड इन इंडियाचा अवलंब केल्यास आपोआपच देशाची समृद्धी बळकट होईल, असे ते म्हणाले.

व्यापारी-दुकानदारांमध्ये उत्साहाची लाट : दुकानदार आणि व्यावसायिक नवीन जीएसटी बदलांबद्दल खूप उत्साहित आहेत. ते ही सुधारणा त्वरित ग्राहकांना पोहोचवण्याचे काम करत आहेत. या करप्रणालीमुळे व्यापाऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि ग्राहक स्वस्त दरात वस्तू खरेदी करू शकतील. ही सुधारणा ‘नागरिक देवो भव’ या भावनेचे प्रतीक असल्याचेही पंतप्रधानांन नमूद केले.

गुंतवणूक आणि उत्पादनावर भर : पंतप्रधान मोदींनी राज्यांना गुंतवणुकीसाठी वातावरण निर्माण करण्याचे आणि उत्पादनाला गती देण्याचे आवाहन केले. केंद्र आणि राज्य सरकारे एकत्रितपणे पुढे गेल्यासच आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होईल, असे ते म्हणाले. देशाच्या उत्पादनाची गुणवत्ता इतकी मजबूत असावी की जग भारताला ‘जागतिक उत्पादन केंद्र’ म्हणून पाहील, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.

स्वातंत्र्यापासून आतापर्यंत स्वदेशीची शक्ती : देशाचे स्वातंत्र्य स्वदेशी चळवळीमुळे बळकट झाले आणि आता देशाची समृद्धी देखील स्वदेशीतूनच येईल. आपण परदेशी वस्तूंवरील आपले अवलंबित्व संपवून मेड इन इंडियाचा अवलंब केला पाहिजे. भारतात बनवलेल्या उत्पादनांच्या गुणवत्तेमुळे जगात भारताचा अभिमान वाढला पाहिजे आणि हा प्रत्येक नागरिकाचा संकल्प असावा, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

Comments are closed.