प्रथम आपल्या स्वतःच्या घराची काळजी घ्या!
संजय झा यांचे राहुल गांधींना खुले पत्र
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काँग्रेसचे केरळमधील खासदार शशी थरुर यांच्यावरुन सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लक्ष्य केले जात आहे. ‘मी काँग्रेससाठी उपलब्ध आहे. तथापि, काँग्रेसला माझी आवश्यकता नसेल, तर मी वेगळा विचार करु शकतो’ असे विधान काही दिवसांपूर्वी थरुर यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी प्रवक्ते संजय झा यांनी राहुल गांधी यांना इशारा दिला आहे. प्रथम स्वत:चे घर सांभाळा. नंतर भारतीय जनता पक्षाशी लढण्याची भाषा करा, अशी सूचना त्यांनी गांधी यांना खुल्या पत्रातून केली आहे. त्यांनीच हे खुले पत्र प्रसिद्ध केले आहे.
नेतृत्व कोणत्याही प्रकारचे असो, ते करत असताना नेत्याने अडचणीच्या स्थितीवर मात करण्याचे कौशल्य दाखविले पाहिजे. पक्षावरील संकट नेत्याने खुबीने दूर केले पाहिजे. अवघड वाटणाऱ्या समस्याही संवाद आणि सौहार्दाने सोडविल्या पाहिजेत. त्या दडविण्याचा किंवा टाळण्याचा प्रयत्न होऊ नये. असा उपदेश संजय झा यांनी गांधी यांना या पत्रातून केला असून थरुर यांची भलावणही केली आहे.
सक्षम संसद सदस्य
शशी थरुर हे प्रभावी संसदपटू आहेत, याची तुम्हाला कल्पना आहे. ज्यांची ओळख करुन द्यावी लागत नाही, अशा मोजक्या संसदपटूंपैकी ते एक आहेत. ते काँग्रेसची मोलाची ठेव आहेत. अशा नेत्याला पक्षनेतृत्वाशी संपर्क करण्यासाठी प्रसारमाध्यमांचा आधार शोधावा लागतो, ही दुर्दैवाची बाब आहे. त्यांना आपले म्हणणे तुमच्या पर्यंत किंवा काँग्रेसच्या श्रेष्ठींपर्यंत पोहचविण्यासाठी वृत्तपत्रांकडे जावे लागते, हे ठीक नाही. काँग्रेसने भारतीय जनता पक्षाशी लढले पाहिजे, यात संशय नाही. तथापि, प्रथम स्वत:चे घर सावरले पाहिजे. तसे केल्यासच भारतीय जनता पक्षाशी संघर्ष करण्याची शक्ती प्राप्त होईल. वर्षानुवर्षे भारतीय जनता पक्षाशी संघर्ष करण्याची भाषा करण्यात वाया घालविणे योग्य नाही. यामुळे काँग्रेसचे देशभरातील कार्यकर्ते आणि पक्षसंघटना हताश होत आहे. सत्ताधाऱ्यांना आव्हान देण्याची ज्या पक्षाची इच्छा आहे, त्या पक्षाने चपळ आणि सत्वर हालचाली केल्या पाहिजेत. त्याने सदैव हिशेबी धोका पत्करण्यासाठी सज्ज असले पाहिजे, तसेच सजग असावयास हवे. काँग्रेसने भविष्यात योग्य ठिकाणी घाव घातला पाहिजे, हे खरे असले, तरी आज काँग्रेस स्वत:वरच घालत असल्याचे दिसत आहे. हे दृष्य दिसू नये, असे आम्हाला वाटते, असे झा यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.
शशी थरुर यांची व्यथा
केरळमधून चार वेळा काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक जिंकलेले शशी थरुर हे सध्या पक्ष नेतृत्वासंबंधात कमालीचे हताश झालेले दिसून येतात. केरळमधील काँग्रेसच्या निर्नायकी अवस्थेवर त्यांनी जाहीररित्या टीका केली आहे. तसेच स्वत:चे काँग्रेसमधील नेमके स्थान कोणते, या संबंधी चर्चा करण्यासाठी त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. अनेकदा, त्यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वासंबंधातही जाहीर नाराजी व्यक्त केल्याचे तो चर्चेचा विषय झाला आहे.
Comments are closed.