पैसे घ्या, पण स्वेच्छेने मतदान करा.
सभेत स्टॅलिन यांच्यावर बरसले विजय : शिटी वाजवून द्रमुकला सत्तेवरून घालवा
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूत यंदा होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवरून राजकारण तापले आहे. याचदरम्यान तमिलगा वेत्री कझगम (टीव्हीके)चा प्रमुख आणि अभिनेता थलपति विजय यांनी एका जाहीर सभेला संबोधित करत सत्तारुढ द्रमुक सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. याचबरोबर सभेच्या व्यासपीठावरून विजय यांनी लोकांना शपथ दिली आहे. माझे मत माझा अधिकार असून याला कुणीच खरेदी करू शकत नाही. आमचे मत ‘शिटी’साठी आहे असे विजय यांनी उपस्थित समुदायाला उद्देशून म्हटले आहे. शिटी हे त्याच्या पक्षाचे चिन्ह आहे. स्वत:च्या मताचा योग्यप्रकारे वापर करा आणि कुणाच्या दिशाभूलला बळी पडू नका असे आवाहनही त्याने केले आहे.
याचबरोबर विजय यांनी स्वत:च्या संबोधनात मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांच्यावर निशाणा साधला आहे. माझ्यासाठी एसओपीचा अर्थ स्टॅलिन ऑपरेटिंग प्रोसिजर आहे. निवडणुकीच्या काळात लोकांना पैसे वाटले जातात. जर कुणी हजारो रुपये देण्यास आला तर ते घ्या, कारण तो तुमचाच पैसा आहे. परंतु पैसे घतल्यावर मतदान स्वत:च्या मर्जीने करा आणि अशा लोकांना शिटी वाजवून सत्तेवरून हाकला असे आवाहन विजय यांनी जनतेला केले आहे.
अनुभवाचा मुद्दा
जे लोक माझ्या अनुभवावर प्रश्न उपस्थित करत आहेत, त्यांच्याकडे घोटाळे करण्याशिवाय अन्य कुठला अनुभव आहे? आमच्याकडे अनुभव नाही, परंतु आम्हाला लुटीचाही अनुभव नसल्याचे प्रत्युत्तर विजय यांनी स्वत:वरील टीकेला दिले आहे.
टीव्हीकेला महिलांचे समर्थन
स्टॅलिन सरकारने अचानक 2 हजार रुपयांचे ‘समर स्पेशल पॅकेज का घोषित केले. उन्हाळा केवळ यंदाच आला आहे का? आमच्या पक्षाला खासकरून महिलांचे मोठे समर्थन मिळतेय. शिटी निवडणूक चिन्हाच्या समर्थनार्थ महिलांच्या वाढत्या आवाजामुळे द्रमुक घाबरून गेला आहे. याच भीतीपोटी स्टॅलिन सरकारने लवकर पैसे जारी केले. द्रमुक आता टीव्हीकेला स्वत:चा खरा राजकीय प्रतिस्पर्धी मानत असल्याचा दावा विजय यांनी केला आहे.
महिलांसाठी स्टॅलिन यांच्या घोषणा
यापूर्वी मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी कलैग्नर महिला अधिकार योजनेच्या अंतर्गत फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलचा प्रत्येकी 1 हजार रुपयांचा हप्ता जारी करण्यात आल्याची घोषणा केली. याचबरोबर 2 हजार रुपयांचे अतिरिक्त ‘समर स्पेशल पॅकेज’ही देण्यात आले आहे. अशाप्रकारे एकूण 5 हजार रुपयांची प्रत्येकी रक्कम 1.31 कोटी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. तसेच पुन्हा सत्तेवर आल्यावर ‘द्रविडियन मॉडेल 2.0’ अंगर्तत मासिक सहाय्य 1 हजार रुपयांवरून वाढवत 2 हजार रुपये करण्याचे आश्वासन स्टॅलिन यांनी दिले आहे.
तामिळनाडू विधानसभेवर एक नजर
234 सदस्यीय तामिळनाडू विधानसभेची निवडणूक चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत होणार आहे. 2021 च्या निवडणुकीत द्रमुकने 133 जागा जिंकल्या होत्या आणि आघाडीतील सहकारी पक्षांसोबत मिळून राज्यात सरकार स्थापन केले होते. तर मुख्य विरोधी पक्ष अण्णाद्रमुकला 66 जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदाच्या निवडणुकीत विजय यांचा टीव्हीके हा पक्ष उतरणार असल्याने राजकीय संघर्षाला त्रिकोणी स्वरुप प्राप्त होणार आहे. विजय यांचा पक्ष किती मते मिळवितो यावरच निकालाचे स्वरुप अवलंबून राहणार असल्याचे मानले जातेय.
Comments are closed.