Asia Cup: ट्रॉफी हवी असेल तर घेऊन जा, मी इथेच बसलोय! पीसीबी प्रमुख नक्वींचा टीम इंडियाला थेट इशारा
मोहसिन नक्वी (Mohsin Naqvi) यांनी आशिया कप फायनलनंतर ट्रॉफी हॉटेलमध्ये नेली होती. आता ते म्हणत आहेत की, ते ट्रॉफी देण्यासाठी पूर्ण तयार आहेत, पण त्यासाठी टीम इंडियाने त्यांच्या जवळ यायला हवे. अलीकडेच असा दावा करण्यात आला होता की, मोहसिन नक्वी यांनी आशियन क्रिकेट कौन्सिलच्या (ACC) बैठकीत टीम इंडियाची माफी मागितली आहे. मात्र, एका सोशल मीडिया पोस्टमधून नक्वी यांनी हे सर्व दावे खोटे ठरवले आणि ते भारतीय संघाला ट्रॉफी देण्यासाठी तयार असल्याचे स्पष्ट केले.
हा वाद प्रत्यक्षात तिथून सुरू झाला जेव्हा फायनलमध्ये भारताने पाकिस्तानला 5 गडी राखून पराभूत केले. त्यानंतर टीम इंडियाने ACC चेअरमन मोहसिन नक्वी यांच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. त्यामुळे पोस्ट मॅच प्रेझेंटेशन उशिरा सुरू झाले आणि नक्वी आपल्या हट्टामुळे ट्रॉफी घेऊन मैदानाबाहेर निघून गेले.
यानंतर 30 सप्टेंबरला ACC ची बैठक झाली, ज्यात बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajiv Shukla) यांनी नक्वींना कठोर शब्दांत प्रश्न केले.
यापूर्वी बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया (Devjit Sakiya) यांनीही गरज पडल्यास नक्वींची तक्रार ICC कडे करण्याचा इशारा दिला होता. या दरम्यान अशी अफवा पसरली की, नक्वी यांनी बीसीसीआय आणि भारतीय संघाची माफी मागितली आहे. मात्र नक्वींनी नुकत्याच केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये स्पष्ट सांगितले की, त्यांनी कोणतीही माफी मागितलेली नाही.
Comments are closed.