राशिद खानवर तालिबान सरकारची बंदी? कर्णधारपदही गेलं; नेमकं प्रकरण काय?

अफगाणिस्तानचा स्टार लेगस्पिनर राशिद खान सध्या एका मोठ्या वादात अडकल्याचे वृत्त समोर येत आहे. ताज्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने राशिद खानला देशात येण्यापासून रोखले असून त्याच्यावर बंदी घातल्याचा खळबळजनक दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राशिद खानने सार्वजनिक व्यासपीठावर अफगाणिस्तानातील महिलांच्या शिक्षणाचे समर्थन केले होते. त्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे तालिबान सरकारच्या महिला शिक्षण बंदीच्या धोरणावर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. तसेच, नुकत्याच एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात राशिदने आपल्या दुसऱ्या पत्नीसह हजेरी लावली होती. तालिबान सरकारच्या कठोर धोरणांच्या विरोधात ही कृती मानली जात असल्याने सरकार त्याच्यावर कमालीचे नाराज असल्याचे म्हटले जात आहे.

वृत्तानुसार, तालिबान सरकारच्या दबावाखाली अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) राशिद खानला टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून हटवले आहे. एवढेच नाही तर, या संपूर्ण प्रकरणावर जाहीरपणे कोणतेही भाष्य न करण्याची ताकीदही त्याला देण्यात आली आहे. जर त्याने यावर काही विधान केले, तर त्याच्यावर भविष्यात आणखी कडक निर्बंध लादले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अफगाण सरकारच्या मते, राशिद खान एक खेळाडू असूनही त्याने सरकारच्या धोरणांविरुद्ध पावले उचलली आहेत. यामुळेच त्याच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. मात्र, या प्रकरणावर अद्याप राशिद खान किंवा अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Comments are closed.