आमच्याशी बोलतो, ओमान, ईयू प्रगती

वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांचे वक्तव्य : व्यापार करारविषयक मुद्दा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापार करारावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. अनेक फेऱ्यांमधील चर्चेनंतरही सहमती झालेली नाही. तर आता केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल यांनी केवळ अमेरिकाच नव्हे तर ओमान आणि युरोपीय महासंघासोबतची (ईयू) व्यापार विषयक चर्चा प्रगतिपथावर असल्याचे वक्तव्य केले आहे. प्रत्येक मुक्त व्यापार कराराची स्वत:ची गतिशीलता असते आणि सर्व देशांसोबत ही चर्चा वेगाने पुढे सरकत असल्याचे गोयल यांनी म्हटले आहे.

अमेरिका, ओमान, ईयू आणि चिली, पेरू तसेच न्यूझीलंडसोबत मुक्त व्यापार करारावर भारत चर्चा करत आहे. ओमानसोबतच्या मुक्त व्यापार कराराला जवळपास अंतिम स्वरुप देण्यात आले आहे. तर युरोपीय महासंघ आणि अमेरिकेसोबतची चर्चा वेगाने पुढे सरकत आहे असे उद्गार गोयल यांनी काढले आहेत. भारत 1 ऑगस्टपासून प्रस्तावित अमेरिकन रेसिप्रोकल टॅरिफ लागू होण्यापूर्वी अमेरिकेसोबत एक करार करू शकणार का याबद्दल अनिश्चिततेची स्थिती असताना गोयल यांनी ही टिप्पणी केली आहे.

भारतात येणार अमेरिकन अधिकारी

अमेरिकेसोबत आयातशुल्कावरून अनिश्चितता कायम आहे, तर आता चर्चा पुढे नेण्यासाठी अमेरिकन अधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ पुढील महिन्यात म्हणजेच ऑगस्टच्या मध्याला भारतात येणार असल्याचे समजते. भारत सरकार आता विकसित देश आणि भारतासाठी धोका नसलेल्या देशांसोबत व्यापार करार करण्यासाठी लक्ष केंद्रीत करून असल्याचे गोयल यांनी सांगितले.

प्रत्येक आव्हानाला संधीत बदलू

युरोपीय महासंघात भारतीय निर्यातीवर कार्बन सीमा समायोजन कराला मोठा विरोध होत असून यावर पुनर्विचार केला जात आहे, कारण यामुळे तेथील राहणीमान खर्च वाढेल आणि अखेरीस त्यांच्या व्यापारालाही नुकसान पोहोचणार आहे. यामुळे नुकसान युरोपीय महासंघाला होईल, भारताला नव्हे, आम्ही प्रत्येक आव्हानाला संधीत रुपांतरित करू असे उद्गार गोयल यांनी काढले आहेत.

Comments are closed.