तामिळ अभिनेता विजयच्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे
पतीचे अभिनेत्रीशी प्रेमसंबंध असल्याचा आरोप : विवाहाला 27 वर्षे पूर्ण
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळी सुपरस्टार आणि टीव्हीकेचे प्रमुख विजय यांच्या पत्नी संगीताने चेंगलपट्टू येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. याचिकेत विजय यांचे एका अभिनेत्रीशी अवैध प्रेमसंबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे. न्यायालयाने ही याचिका स्वीकारत सदर प्रकरण कुटुंब कल्याण समितीकडे पाठवले आहे. विजय-संगीता हे जोडपे गेल्या दोन वर्षांपासून विभक्त राहत होते. त्यांचे लग्न 1999 मध्ये झाले होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 एप्रिल रोजी न्यायालयात होणार आहे. विजयच्या टीमने आणि संगीताने अद्याप या प्रकरणावर कोणतेही भाष्य केलेले नाही.
विजय आणि संगीताचा विवाह जवळजवळ 27 वर्षांपूर्वी झाला आहे. 25 ऑगस्ट 1999 रोजी हे जोडपे लग्नबंधनात अडकले. एकमेकांशी प्रेमसंबंध जुळल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी त्यांचे लग्न हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही धर्मपद्धतीने झाले होते. या दाम्पत्याने 2000 मध्ये मुलाला आणि 2005 मध्ये मुलीला जन्म दिला होता.
चेंगराचेंगरी घटनेनंतर विजय अडकला वादात
27 सप्टेंबर 2025 रोजी अभिनेता-राजकारणी विजय यांच्या पक्षाच्या, तमिळगा वेट्टी कझगमच्या (टीव्हीके) रॅलीत मोठा जमाव उपस्थित असताना चेंगराचेंगरी झाली होती. या दुर्घटनेत प्रचंड गर्दीमुळे 41 लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे अभिनेता विजय वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या प्रकरणात 12 जानेवारी 2026 रोजी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) रॅलीतील चेंगराचेंगरीच्या संदर्भात अभिनेत्याची सहा तास चौकशी केली होती.
Comments are closed.