मराठी प्रेमात रंगले तामिळी कुटुंब! 51 वर्षांपूर्वी तामिळनाडूतून आले, 11 वर्षांपासून साजरा करतात ‘अनोखा’ मराठी भाषा गौरवदिन

>> बद्रीनाथ खंडागळे

तामिळनाडू येथून आलेले पिल्लयी कुटुंब ५१ वर्षांपासून मराठी वृत्तपत्र वितरक व पुस्तक विक्रेते म्हणून कार्यरत आहे. मराठी भाषा गौरवदिनानिमित्त त्यांनी नवीन मराठी पुस्तके २५ टक्के तर दिवाळी अंक, मासिके व साप्ताहिके ५० टक्के सवलतीच्या दरात नाथषष्ठी यात्रेचा समारोप होईपर्यंत विक्री सुरू केली आहे. मराठी भाषेचा प्रचार-प्रसार, स्वभाषाभिमान व वाचनसंस्कृतीच्या वृध्दीसाठी हाती घेतलेल्या या उपक्रमाचे यंदा ११ वे वर्ष आहे! विशेष म्हणजे हे तमिळी कुटुंब बुकस्टॉलवर, बाहेर अगदी घरीसुद्धा एकमेकांशी मराठी भाषेतच बोलतात. एकूणच हे कुटुंब मराठी भाषेच्या प्रेमरंगात रंगून गेल्याचे पाहायला मिळत आहे.

१९७५ साली मुथय्या पिल्लयी हे तामिळनाडू राज्यातून पैठणला आले. रोजगारासाठी आल्यामुळे त्यांनी दैनिक वृत्तपत्र वितरक म्हणून काम सुरू केले. बसस्थानक परिसरात बुक स्टॉल टाकला. नंतर त्यांना एम. एस. ई. बी. मध्ये सरकारी नोकरी मिळाली. १९७८ साली त्यांनी लहान भाऊ ए. राजप्पा अण्णा यांना तामिळनाडूतून पैठणला आणले. मराठी भाषेतील ओ का ठो कळत नसलेल्या ए. राजप्पा यांना चक्क मराठी वृत्तपत्र वितरणाची जबाबदारी सोपवली. हळूहळू त्यांनी मराठी भाषेला प्राधान्य देत ही भाषा शिकून घेतली. उर्वरित कुटुंब पैठणला आले.

या पार्श्वभूमीवर हे तमिळी कुटुंब वाढले. स्थाईक झाले. घर घेतले. कुटुंबातील अन्य सदस्य विविध कंपन्या व व्यवसायात स्थिरस्थावर झाले. परंतु सेवानिवृत्त झालेल्या व नव्वदीच्या उंबरठ्यावर असलेल्या मुथय्या पिल्लयी आणि ७८ वर्षांचे ए. राजप्पा यांनी मराठी वृत्तपत्र वितरणाची कास काही सोडली नाही. उलट मराठी भाषा व महाराष्ट्रीय संस्कृती यांचा १०० टक्के प्रचार प्रसार करण्याचा कृतीशील आग्रह कायम ठेवला.

त्याचाच एक भाग म्हणून गेल्या ११ वर्षांपासून ते मराठी भाषा गौरव दिन वरील पद्धतीने साजरा करत आहेत. सध्या महाराणा प्रताप चौकात सर्व मराठी दैनिके, वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके व पुस्तके विक्रीचा स्टॉल चालवत आहेत.

शुक्रवारी सकाळी बुक स्टॉल समोर सडा रांगोळी काढून कवी कुसुमाग्रज जन्मदिवस साजरा केला. तसेच वरिल प्रमाणे सवलतीच्या दरात मराठी साहित्य विक्री सुरू केली आहे. यात ज्येष्ठ बंधू मुथय्या पिल्लयी, ए. राजप्पा, सिंधूताई राजप्पा पिल्लयी, साईनाथ पिल्लयी, अरुणा पिल्लयी, बाल सुब्रमण्यम, जय कमल, प्रभुगणेश व विजयेंद्र पिल्लयी आदी सहभागी झाले. कुटुंबातील सदस्य अन्य क्षेत्रात कार्यरत असले तरी ‘मराठी राजभाषा गौरव दिनी’ एकत्र येतात.

Comments are closed.