तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी पेटारा उघडला, सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

चेन्नई: तामिळनाडचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी मोठा निर्णय घेतला आहे. जोसेफ विजय यांनी तामिळनाडूतील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या यानिर्णयामुळं राज्य सरकारचे कर्मचारी आणि शिक्षकांचा महागाई भत्ता 58 टक्क्यांवरुन 2 टक्क्यांनी वाढवून 60 टक्के करण्यात आला आहे. महागाई भत्त्याचे नवे दर 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहेत. यामुळं सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढ आणि  फरक देखील मिळणार आहे.

तामिळनाडूमधील जोसेफ विजय यांच्या टीव्हीके सरकारनं महागाई भत्ता वाढवण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्याचा फायदा 16 लाख सरकारी कर्मचारी, शिक्षक, पेन्शनर्स यांना होणार आहे. वाढत्या महागाईच्या काळात हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी दिलासा मानला जात आहे. गेल्या दिवसांपासून खाद्य पदार्थ, इंधन, वाहतूक आणि दैनदिन गरजांसाठीच्या खर्चात सातत्यानं वाढ होत आहे. या दरम्यान सर्वसामान्य लोकांच्या घरगुती बजेटवर परिणाम झाला आहे. यामुळं महागाई भत्ता वाढवल्यानं कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

राज्य सरकारवर किती भार पडणार?

तामिळनाडू सरकारच्या माहिती व जनसंपर्क विभागानं अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी   कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या हितांना लक्षात घेता निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं आहे. सरकारच्या मते महागाई भत्ता वाढवल्यानं राज्याच्या तिजोरीवर 1230 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. याशिवाय सरकारनं कर्मचारी आणि पेन्शनर्सच्या कल्याणासाठी प्राधान्य देत अतिरिक्त निधी जारी करण्याचा निर्णय घेतला आहे.

महागाई भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातील महत्त्वाचा भाग आहे. यामुळं वाढत्या महागाईची झळ कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळतो. केंद्र आणि राज्य सरकारनं वेळोवेळी महागाईच्या दरानुसार महागाई भत्त्यात बदल करतात. जेव्हा महागाई वाढते तेव्हा कर्मचाऱ्यांच्या हातात येणारी पगाराची रक्कम देखील वाढते. यामुळं सरकारी कर्मचारी महागाई भत्ता वाढीकडे लक्ष ठेवून असतात.

तामिळनाडू सरकारच्या या निर्णयाबद्दल काही तज्ज्ञांनी म्हटलं की इतर राज्यातील कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा वाढू शकतात. काही राज्यांमध्ये कर्मचारी महागाई भत्ता वाढीची प्रतीक्षा करत आहेत. आता देशातील इतर राज्यांकडून महागाई भत्ता वाढवला जाणार का पाहावं लागेल.

महागाई भत्ता वाढवल्यानं कर्मचाऱ्यांना मिळणारा पगार  वाढेल, यामुळं त्यांची खर्च करण्याची क्षमता वाढेल. सणांच्या आणि लग्नाच्या काळात पगार वाढल्यानं बाजारावर याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल.

दरम्यान, राज्य सरकारांकडून आणि केंद्र सरकाराकांकडून वर्षभरात दोनवेळा महागाई भत्ता वाढवला जातो. कर्मचाऱ्यांचं लक्ष महागाई भत्ता वाढीकडे लागलेलं असतं.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.