तामिळनाडूने रुपीमधून हिंदी प्रतीक काढून टाकले
अर्थसंकल्पाच्या लोगोमध्ये तामिळ भाषेतील चिन्ह, भारतीय जनता पक्षाने उडविली द्रमुकची खिल्ली
वृत्तसंस्था/चेन्नई
नव्याने भडकविण्यात आलेल्या हिंदी विरोधी वादाला नवे वळण देताना तामिळनाडू सरकारने आपल्या अर्थसंकल्पावरील लोगोमधील रुपयाचे हिंदी चिन्ह हटविले आहे. त्याच्यास्थानी या लोगोमध्ये तामिळ भाषेतील चिन्हाचा उपयोग करण्यात आला आहे. विशेष बाब अशी की, रुपयाच्या हिंदी चिन्हाची रचना तामिळनाडूत सत्तेवर असलेल्या द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाच्या नेत्याच्या पुत्रानेच केली आहे. तामिळनाडूचा 2025-2026 चा अर्थसंकल्प आज शुक्रवारी त्या राज्याचे अर्थमंत्री थंगम थेन्नारासू हे विधानसभेत मांडणार आहेत. अर्थसंकल्पाच्या लोगोतून रुपयाचे हिंदी चिन्ह हटविण्याची कृतीची खिल्ली भारतीय जनता पक्षाने उडविली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या तामिळनाडू शाखेचे अध्यक्ष के. अण्णामलाई यांनी तामिळनाडू सरकारची ही कृती दांभिकपणाची असल्याची टीका केली. ज्या चिन्हाची रचना तामिळनाडूच्या तामिळ सुपुत्रानेच केली आहे. ते हटवून मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी स्वत:चे हसे करुन घेतले आहे, असा टोला त्यांनी लगावला. तामिळनाडू सरकारची ही कृती आता वादग्रस्ततेत सापडली आहे. मात्र, असे केल्याने त्याचा विशेष राजकीय लाभही त्यांना मिळण्याची शक्यता नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात असून पुढच्या काळात हा वाद कशी वळणे घेतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे, असे मत या विषयातील अनेक तज्ञांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्र्यांची टीका
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी विधानसभेत केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली. त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून केंद्र सरकार तामिळनाडूत हिंदी भाषा थोपण्याचा प्रयत्न करीत आहे. केंद्र सरकारचे शिक्षण धोरण तामिळनाडूची संस्कृती आणि स्थानिक भाषांची बहुविधता यांना धोकादायक ठरत आहे, असाही आरोप त्यांनी केला. हिंदी आणि संस्कृत भाषांच्या वर्चस्वामुळे उत्तर भारतात किमान 25 स्थानिक भाषांचा लोप झाला आहे. मात्र, 100 वर्षांहून अधिक काळ चाललेल्या द्रविडी आंदोलनामुळे तामिळ भाषेचे आणि तामिळ संस्कृतीचे संरक्षण झाले. आमच्या प्रयत्नांमुळे हे साध्य झाले, असा दावा स्टॅलिन यांनी केला.
भाजपच्या आयटीसेलकडूनही खिल्ली
स्टॅलिन यांच्या या धोरणाची भारतीय जनता पक्षाच्या माहिती तंत्रज्ञान कक्षाकडून खिल्ली उडविण्यात आली आहे. रुपयाचे हिंदी चिन्ह तामिळनाडूच्याच उदय कुमार धर्मलिंगम यांनी निर्मिलेले आहे. उदय कुमार हे सुप्रसिद्ध शिक्षणतज्ञ आणि रचनाकार आहेत. त्यांनी निर्माण केलेले हे चिन्ह साऱ्या भारताने हसत खेळत स्वीकारलेले आहे. मात्र एका तामिळ सुपुत्राने निर्माण केलेले चिन्ह हटवून स्टॅलिन यांनी समस्त तामिळी जनतेचाच अपमान केला, अशी टीका करण्यात आली आहे.
तामिळ माध्यमाचे घसरले प्रमाण
तामिळनाडू सरकारने कितीही आव आणला असला, तरी तामिळनाडूत तामिळ माध्यमातून शिकण्याचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. सध्या या राज्यात केवळ 36 टक्के विद्यार्थी तामिळ माध्यमातून शिक्षण घेतात. 64 टक्के विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतात. 2016 पासून तामिळ माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली असून इंग्रजी भाषेचा प्रभाव वाढला आहे. सरकारी तामिळ शाळांनाही इंग्रजी माध्यमाकडे वळावे लागले आहे. अशी स्थिती असताना द्रमुक पक्षाचा हिंदी विरोध हास्यास्पद आहे, असे मत अनेक तज्ञांनीही व्यक्त केले आहे. द्रमुकच्या हिंदी विरोधात भाषिक अस्मितेपेक्षा राजकीय कारण अधिक आहे. तामिळनाडूत हिंदी भाषेचा प्रसार झाल्यास आपल्या राजकीय प्रभावावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी त्यांची समजूत आहे. त्यामुळे त्यांनी हिंदीला इतक्या टोकाचा विरोध चालविला असल्याचीही चर्चा आहे.
Comments are closed.