संघात खेळण्यासाठी कागदपत्रांमध्ये फेरफार! आरोपी क्रिकेटपटूची बीसीसीएकडे तक्रार
कोणत्याही स्पर्धेत किंवा संघात खेळण्यासाठी चुकीची कागदपत्रे सादर करण्याची पद्धत काही नवीन नाही. नुकतेच ‘पुद्दुचेरी नेटिव्ह क्रिकेट प्लेयर असोसिएशन’ने बीसीसीआयच्या अँटी-करप्शन युनिटला (ACU) पत्र लिहून सात्विक देशवाल नावाच्या खेळाडूवर आरोप केला आहे की, त्याने पुद्दुचेरी क्रिकेट संघातून खेळण्यासाठी आपल्या कागदपत्रांमध्ये फेरफार (Forging) केली आहे.
तक्रारीच्या ईमेलमध्ये असे म्हटले आहे की, ‘आम्ही बीसीसीआयच्या अँटी-करप्शन युनिटकडे सात्विक देशवालने पुद्दुचेरी संघासाठी पात्र ठरण्यासाठी आणि खेळण्यासाठी बनावट कागदपत्रे वापरल्याबद्दल औपचारिक तक्रार करून एक महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आहे. हे प्रकरण तुमच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही, आम्हाला असे दिसते की अनेक खेळाडू कथितरित्या अशाच पद्धतींचा वापर करून पुद्दुचेरीसाठी सामन्यांमध्ये भाग घेत आहेत. यामुळे पात्रता पडताळणी प्रक्रियेच्या सत्यतेवर आणि आतापर्यंत केलेल्या सुधारात्मक कारवाईच्या प्रभावीतेवर गंभीर प्रश्न निर्माण होतात.’
ईमेलमध्ये पुढे म्हटले आहे की, ‘आम्ही बीसीसीआय एसीयूला विनंती करतो की आमच्या तक्रारीचे त्वरित पुनरावलोकन करावे आणि आम्हाला या प्रकरणातील सद्यस्थिती आणि सुरू केलेल्या कारवाईबद्दल कळवावे. आम्हाला विश्वास आहे की मिळालेल्या तक्रारींचा स्वीकार करणे आणि तपासाचे निष्कर्ष किंवा प्रगतीबद्दल माहिती देणे ही एसीयूची जबाबदारी आहे. आम्ही या आठवड्या अखेरपर्यंत तुमच्या उत्तराची वाट पाहू. बीसीसीआय एसीयूकडून कोणताही प्रतिसाद किंवा स्पष्टीकरण न मिळाल्यास, आम्ही हा मुद्दा योग्य मीडिया चॅनेलद्वारे लोकांच्या माहितीसाठी पुढे नेण्यास भाग पडू.’
सात्विक देशवाल हा १८ वर्षांचा डाव्या हाताचा फिरकीपटू आहे. तक्रारीनुसार, तो ‘किमान एक वर्षासाठी पुद्दुचेरीचा रहिवासी आणि बोनाफाईड’ असण्याच्या पात्रतेच्या निकषांची पूर्तता करत नाही. ईमेलमध्ये असाही आरोप करण्यात आला आहे की, हा क्रिकेटपटू ‘१० ऑगस्ट २०२५ पर्यंत हरियाणा क्रिकेट असोसिएशन लीगमध्ये खेळला होता.’
तथापि, क्रिकेट असोसिएशन पुद्दुचेरीचे माजी अध्यक्ष पी. दामोदरन यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी ‘रेवस्पोर्ट्स’ला सांगितले की, “ही पूर्णपणे खोटी कथा आहे, आम्ही त्यांच्यावर (पुद्दुचेरी नेटिव्ह क्रिकेट प्लेयर असोसिएशन) ५० कोटी रुपयांचा दावा ठोकू. आमचे वकील त्यांच्याविरुद्ध केस तयार करत आहेत.”
Comments are closed.