मुंबईत पाण्याचे हाल होणार, आजपासून टँकरचालक संपावर
धरणांतील पाण्याने तळ गाठल्यामुळे मुंबईकर पाणीकपातीच्या प्रश्नाला तोंड देत आहेत. त्यातच रविवारी मध्यरात्रीपासून टँकरचालक संपावर गेले आहेत. केंद्रीय भूजल प्राधिकरण नियमांच्या अंमलबजावणीमुळे टँकर व्यवसाय संकटात सापडला आहे. त्यावरून टँकर व्यावसायिकांमध्ये सरकारविरोधात संतापाची लाट उसळली असून त्यांच्या संपामुळे मुंबईतील पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनण्याची चिन्हे आहेत.
केंद्र सरकारच्या नवीन नियमाच्या निषेधार्थ मुंबईतील वॉटर टँकरचालक आणि मालकांची संपाचे शस्त्र उपसले आहे. पेंद्राच्या जाचक नियमांच्या पार्श्वभूमीवर मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आणि मागण्यांबाबत तोडगा काढण्याची विनंती केली. त्यावरही राज्य सरकारने कोणतीही यशस्वी मध्यस्थी केली नाही. अखेर पालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केंद्र सरकारच्या वतीने धाडण्यात आलेल्या नोटिसीच्या निषेधार्थ टँकरचालक रविवारी मध्यरात्रीपासून संपावर गेल्याचे समजते. मुंबई शहर आणि उपनगरांत गेल्या काही दिवसांपासून दहा टक्के पाणीकपात लागू केली आहे. त्यातच टँकरचालकांची सेवा बंद झाल्याने शहरात पाणीबाणी निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
बांधकाम प्रकल्पांसह विविध सेवा अडचणीत
संपाचा इमारत व इतर बांधकाम प्रकल्पांसह झोपडपट्टय़ा आणि व्यावसायिक आस्थापनांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. महापालिकेची रुग्णालये, अत्यावश्यक यंत्रणा तसेच अन्य विविध सेवांवर टँकरचालकांच्या संपाचा परिणाम होऊ शकतो, असे मत पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले.
Comments are closed.