…मग मुलींना देहविक्री व्यवसायात ढकलून दिले जाते, तनुश्री दत्ताचा पुन्हा इंडस्ट्रीवर गंभीर आरोप
सिनेसृष्टीत ‘#MeToo’ मोहिमेची ठिणगी टाकणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये बोलताना तिने चित्रपटसृष्टीबाबत आणखी एक धक्कादायक माहिती उघड केली. इंडस्ट्रीतील नव्याने येणाऱ्या, आपली ओळख निर्माण करू पाहणाऱ्या तरुण कलाकारांना कशा प्रकारे खोट्या आश्वासनांच्या जाळ्यात ओढले जाते आणि त्यांचे शोषण केले जाते, यावर तिने प्रखर भाष्य केले. तसेच यावेळी तिने या तरुण कलाकारांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
सिनेसृष्टीतील कटू वास्तवाबाबत बोलताना तनुश्री म्हणाली की, सुरुवातीला या तरुणांच्या सौदर्याचे आणि प्रतिभेचे कौतुक केले जाते. “तू हिरोईन बनण्यासाठीच जन्माला आली आहेस” किंवा “तू मोठा स्टार होशील” असे गोड शब्द बोलून त्यांचा विश्वास संपादन केला जातो. मात्र त्याच्याकडे खरोखर कला आहे की नाही हे कोणालाच माहित नसतं. हे कौतुक अनेकदा एक सापळा असतो, ज्यामध्ये अडकल्यानंतर कलाकारांना त्यांच्या मर्जीविरुद्ध कामे करण्यास भाग पाडले जाते, असे धक्कादायक वास्तव तिने मांडले.
तनुश्रीने पुढे स्पष्ट केले की, एकदा का या कलाकारांचा आत्मविश्वास वाढवला की, त्यानंतर त्यांना ठराविक लोकांकडे जाण्यासाठी दबाव टाकला जातो. ‘जा, त्या व्यक्तीला भेट’ किंवा ‘जा, या व्यक्तीला भेट’ अशा वेळी तुम्हाला प्रचंड आत्मसंयम बाळगावा लागतो. अनेकदा या परिस्थितीचा फायदा घेऊन पीडितांना देहविक्री व्यवसायासारख्या दलदलीत ढकलले जाते. अशा गोष्टी खूप क्वचितच जगासमोर येतात. इंडस्ट्री फक्त यशाचे गुणगान गाते, असे धक्कादायक विधान यावेळी तनुश्रीने केले.
मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा उल्लेख करताना ती म्हणाली की, शोषणाच्या या चक्रामुळे अनेकांची मानसिक स्थिती खालावते. काही जण नैराश्यात जाऊन इंडस्ट्री सोडून आपल्या गावी परततात, तर काही जण स्वतःला पूर्णपणे संपवून टाकतात. त्यामुळे सिनेसृष्टीत येताना कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका आणि आपल्या आत्मसंयमावर नियंत्रण ठेवा, असा मोलाचा सल्ला तनुश्रीने या निमित्ताने दिला आहे.
Comments are closed.