दर शस्त्रे म्हणून वापरले जात आहेत: जयशंकर

रायसीना डायलॉगमध्ये जागतिक व्यापारयुद्धावर मांडली भूमिका : आर्थिक संबंधांचा रणनीतिक स्वरुपात वापर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

जागतिक व्यापारात वाढते शुल्क आणि निर्बंधांची वृत्ती एक सत्य असून विविध देश स्वत:च्या आर्थिक हितांच्या रक्षणासाठी त्यांचा वापर करत असल्याचे विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. आम्हाला पसंत असो किंवा नसो आयातशुल्क, निर्बंध ही सध्याची वस्तुस्थिती असून देश स्वत:च्या हितांच्या रक्षणासाठी त्यांचा वापर करतात असे वक्तव्य जयशंकर यांनी केले आहे.

जयशंकर यांच्या या वक्तव्याला अलिकडच्या जागतिक घडामोडींच्या संदर्भात पाहिले जात आहे, सद्यकाळात व्यापार आणि आर्थिक संबंधांना रणनीतिक अस्त्राच्या स्वरुपात वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. जयशंकर यांनी ही टिप्पणी नवी दिल्लीत आयोजित रायसीना डायलॉगदरम्यान ‘कमिसार्स अँड कॅपिटलिस्ट्स : पॉलिटिक्स, बिझनेस अँड न्यू वर्ल्ड ऑर्डर’ नावाच्या पॅनेल चर्चेदरम्यान केली आहे.

शुल्क आणि निर्बंध सद्यकाळातील वास्तव असून अनेक देश त्यांचा वापर करतात. जर आम्ही मागील एक दशकावर नजर टाकली तर कुठल्याही प्रकारची क्षमता किंवा आर्थिक घडामोडींचे मोठ्या प्रमाणावर सैन्यीकरण करण्यात आल्याचे दिसून येते. मागील एक दशकात वित्तीय प्रवाह, ऊर्जा पुरवठा आणि तंत्रज्ञान यासारख्या अनेक आर्थिक घडामोडींचा वेगाने एक अस्त्र म्हणून वापर होऊ लागला आहे. अशास्थितीत जग एका नव्या आर्थिक समीकरणाच्या दिशेने वाटचाल करत आहे, जेथे धोरणे अन् निर्बंध एका नव्या काळातील रणनीतिक प्रतिस्पर्धेचा हिस्सा ठरले आहेत, असे जयशंकर यांनी म्हटले आहे. व्यापार केवळ आर्थिक लाभापर्यंत मर्यादित नाही, तर हा रोजगार आणि समग्र राष्ट्रीय शक्तीशी देखील जोडलेला आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी लढता, कारण हा तुमचा रोजगार आणि समग्र राष्ट्रीय शक्तीचा एक महत्त्वपूर्ण हिस्सा असल्याचे उद्गार जयशंकर यांनी काढले आहेत.

आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये बदल

सध्या आंतरराष्ट्रीय संबंध पूर्वीच्या तुलनेत कमी प्रतिबंधित झाले आहेत. आज विविध क्षेत्रांदरम्यान विभाजनाच्या रेषा पुसट होत आहेत. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये देखील हा बदल स्पष्टपणे दिसून येऊ शकतो. जर आम्ही एक दशकापूर्वीची स्थिती पाहिली तर आजच्या तुलनेत ती अधिक संतुलित होती असे जयशंकर यांनी नमूद केले आहे.

शक्तिसंतुलनाची नवी दिशा

सद्यकाळात व्यापार केवळ आर्थिक घडामोडींपुरती मर्यादित नसून तो भू-राजकीय आणि राष्ट्रीय शक्ती समीकरणाचा देखील महत्त्वाचा हिस्सा ठरला असल्याचे संकेत जयशंकर यांच्या वक्तव्यातून मिळतात. अशा स्थितीत आगामी काळात आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणांमध्ये मोठे बदल दिसून येऊ शकतात.

अमेरिका-भारत व्यापारी तणाव

अमेरिकेने भारतासह विविध देशांमधून आयात होणाऱ्या उत्पादनांवर वाढीव शुल्क लादण्याची घोषणा केली असताना जयशंकर यांनी ही भूमिका मांडली आहे. यापूर्वी 13 मार्च रोजी व्हाइट हाउसच्या माध्यम सचिव कॅरोलीन लेविट यांनी अमेरिकेच्या उत्पादनांवर विविध देशांकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्कावर चिंता व्यक्त केली होती. तसेच त्यांनी भारताकडून अमेरिकन मद्य आणि कृषी उत्पादनांवर आकारण्यात येणाऱ्या शुल्काचा विशेष स्वरुपात उल्लेख केला होता. माझ्याकडे विविध देशांकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्काचा एक तक्ता आहे. कॅनडाकडून अमेरिकन पनीर आणि बटरवर सुमारे 300 टक्के शुल्क आकारण्यात येते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे निष्पक्ष आणि संतुलित व्यापार धोरणावर विश्वास ठेवतात आणि प्रत्युत्तराच्या सिद्धांताचे पालन करू इच्छितात, असे लेविट यांनी स्पष्ट केले होते.

Comments are closed.