चार वर्षांचे असताना तुरुंगवास भोगणारे तारिक रहमान होणार बांगलादेशचे पंतप्रधान; 20 वर्षांनी ‘बीएनपी’ला बहुमत, ‘जमात-ए-इस्लामी’चा दारुण पराभव

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शेख हसीना यांचे सरकार उलथवल्यानंतर बांगलादेशात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने (बीएनपी) 299 पैकी 212 जागा जिंकून संपूर्ण बहूमत प्राप्त केले आहे. बहुमतासाठी 150 हा जादुई आकडा पार करणे आवश्यक होते. या निकालानंतर बांगलादेशात जवळपास 20 वर्षांनी बीएनपी पुन्हा सत्तेवर येणार आहे. माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र आणि बीएनपीचे अध्यक्ष तारिक रहमान हे पंतप्रधान होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. जमात-ए-इस्लामीच्या नेतृत्वातील 11 पक्षांच्या आघाडीला 77 जागा जिंकता आल्या आहेत.

वर्ष 2024 मध्ये विद्यार्थी आंदोलनानंतर हसीना यांचे सरकार उलथविण्यात आले आणि शेख हसीना यांनी पलायन करून हिंदुस्थानात आश्रय घेतला. त्यानंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले होते. बांगलादेशातील सार्वत्रिक निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गुरुवारी झालेल्या मतदानानंतर आज लगेच मतमोजणी झाली. त्यात बीएनपीने संपूर्ण बहुमत प्राप्त केले. तारिक यांनी दोन जागांवरून निवडणूक लढवली आणि दोन्ही जागांवर विजय मिळवला. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱया गोपालगंजमधील तिन्ही जागा तारिक रहमान यांच्या बीएनपी पक्षाने जिंकल्या.

बांगलादेशच्या निवडणुकीत कट्टरपंथी जमात-ए-इस्लामी पक्षाचा दारुण पराभव झाला. त्यांच्या आघाडीला फक्त 77 जागा मिळाल्या.

पंतप्रधान मोदी यांनी केले रहमान यांचे अभिनंदन

पंतप्रधान मोदींनी एक्सवर पोस्ट करून बीएनपी नेते तारिक रहमान यांचे अभिनंदन केले. त्यांनी लिहिले की,'तारिक रहमान यांच्याशी बोलणे आनंददायी होते. बांगलादेश निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाबद्दल मी त्यांचे अभिनंदन केले. बांगलादेशच्या लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना मी शुभेच्छा देत पाठिंबा व्यक्त केला.'

कोण आहेत तारिक रहमान?

बांगलादेशमध्ये पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार तारिक रहमान हे बांगलादेशातील नेते झियाउर रहमान आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र आहेत. 1971च्या मुक्ती संग्रामात त्यांना केवळ 4 वर्षांचे वय असताना अटक करण्यात आली होती. झियाउर रहमान यांची हत्या झाली त्यावेळी ते 15 वर्षांचे होते. 2007 मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांत त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर राजकारणापासून लांब राहण्याच्या अटीवर त्यांची सुटका झाली होती, असा दावा करण्यात येतो. त्याच वर्षी ते लंडन येथे वास्तव्यास निघून गेले. वर्ष 2018 मध्ये त्यांना शेख हसीना यांच्या 2004 मधील रॅलीवर हल्ल्याच्या आरोपांखाली जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

Comments are closed.