रतन टाटांची शिकवण विसरली नाही TCS! नोकर कपातीतही कर्मचाऱ्यांसाठी उचललं मोठं पाऊल
टीसीएस लेफ 2025: देशातील आघाडीची माहिती तंत्रज्ञान कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) सध्या मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करत आहे. बदलत्या ग्राहक मागण्या, वाढता ऑटोमेशनचा वापर आणि नव्या तंत्रज्ञानाशी सुसंगत राहण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे.
जागतिक स्तरावर टीसीएसमध्ये सुरू असलेल्या नोकरकपातीमुळे टाटा समूहावर (Tata Group) टीकेची झोड उठली आहे, तसेच कंपनीवर जबरदस्तीने राजीनामे घेण्याचे आरोप देखील होत आहेत. या पार्श्वभूमीवर, टीसीएसने एक महत्त्वपूर्ण आणि ठोस पाऊल उचलले आहे. कंपनी सध्या अशा कर्मचाऱ्यांची पुनर्रचना करत आहे ज्यांचे तांत्रिक ज्ञान कालबाह्य झाले आहे किंवा जे नव्या कामकाजाच्या प्रणालींशी जुळवून घेण्यात अपयशी ठरत आहेत. कंपनीचा स्पष्ट दृष्टिकोन आहे की, नवीन युगात टिकण्यासाठी नव्या कौशल्यांची गरज आहे, आणि त्यामुळेच जुनी कौशल्ये असलेले कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेर काढले जात आहे.
TCS Layoff 2025 : नोकर कपातीतही कर्मचाऱ्यांसाठी उचललं मोठं पाऊल
मात्र, कंपनी केवळ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करत नाही, तर त्यांच्या पुढील भविष्याला आधार देण्यासाठी सहा महिन्यांपासून ते दोन वर्षांपर्यंतचे वेतन पॅकेज (Severance Package) देत आहे. रतन टाटांच्या (Ratan Tata) निधनानंतरही टाटा समूहात त्यांच्या मूल्यांचा वारसा जिवंत असल्याचे या निर्णयातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. काही महिन्यांपूर्वी टीसीएसने 12,000 कर्मचाऱ्यांना कामावरून मुक्त करण्याची घोषणा केली होती. मात्र आता, या कर्मचाऱ्यांना दोन वर्षांपर्यंतचे वेतन पॅकेज देण्याची तयारी कंपनीने दर्शवली आहे. यामुळे नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांना तातडीचा आर्थिक आधार मिळणार असून, त्यांना नव्या संधी शोधण्यासाठी आवश्यक वेळ आणि स्थैर्य मिळणार आहे.
एकंदरीत, ज्या कर्मचाऱ्यांची भूमिका आणि कौशल्ये सध्याच्या कंपनीच्या गरजांशी सुसंगत नाहीत, त्यांना या नोकरकपातीचा फटका बसण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया केवळ वर्तमानापुरती मर्यादित नसून, भविष्यातही ज्या कर्मचाऱ्यांचे कौशल्य संच (Skillset) बदलत्या तांत्रिक मागण्यांशी जुळत नाही, अशांवरही ही अंमलबजावणी होणार आहे. विशेषतः मध्यम व वरिष्ठ पदांवरील कर्मचाऱ्यांना या पुनर्रचनेचा सर्वाधिक परिणाम भोगावा लागू शकतो, असे संकेत मिळत आहेत.
TCS Layoff 2025 : नोकरकपातीत टाटांची ऑफर काय आहे?
प्रभावित कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम तीन महिन्यांचा नोटीस पगार (Notice Pay) दिला जाणार आहे. त्यानंतर, त्यांच्या सेवेचा कालावधी आणि पदानुसार अतिरिक्त सेवा वेतन (Severance Pay) देण्यात येईल, ज्याचा कालावधी सहा महिन्यांपासून दोन वर्षांपर्यंत असू शकतो. 15 वर्षांहून अधिक सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना सर्वाधिक पॅकेज मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, ‘बेंच’वर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी वेगळा प्रस्ताव आहे. हे असे कर्मचारी असतात जे सतत आठ महिन्यांहून अधिक काळ कोणत्याही प्रोजेक्टवर कार्यरत नसतात.सामान्यपणे अशा कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांच्या नोटीस पगारापुरतेच पॅकेज दिले जाण्याची शक्यता आहे. मात्र, 10 ते 15 वर्षांपर्यंत सेवा केलेल्या बेंच कर्मचाऱ्यांना सुमारे 1.5 वर्षांचे वेतन पॅकेज मिळू शकते, असे संकेत मिळाले आहेत.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.