उल्हासनगरात टीडीआर घोटाळा? पालिका प्रशासनावर ताशेरे, दोषींवर कारवाई करा, मंत्रालयातून खरेदी-विक्रीचे व्यवहार थांबवण्याचे आदेश

उल्हासनगर शहरातील टीडीआर घोटाळ्यावरून नगरविकास विभागाने पालिका प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. टीडीआर प्रकरणात झालेल्या गैरप्रकाराची चौकशी पूर्ण होईपर्यंत तीन प्रकल्पांचे खरेदी-विक्रीचे सर्व व्यवहार थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच दहा दिवसांत चौकशी पूर्ण करून दोषींवर कारवाईचा बडगा उगारा असेही नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांनी बजावले आहे.

रस्ते तसेच अन्य सार्वजनिक कामांसाठी एखादा भूखंड आरक्षित केल्यानंतर त्याच्या बदल्यात जमीन मालकाला टीडीआर दिला जातो. मात्र काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून बिल्डरांनी टीडीआर घोटाळा केल्याचा आरोप होत आहे. याची गंभीर दखल घेऊन नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी बैठक घेतली. यावेळी उल्हासनगर पालिकेचे आयुक्त मनीषा आव्हाळे ऑनलाइन उपस्थित होते. गुप्ता यांनी या बैठकीत संबंधित प्रकरणांवर चौकशी पूर्ण होईपर्यंत केवळ व्यवहारच नव्हे तर या टीडीआरवर आधारित कोणत्याही बांधकाम परवानग्यादेखील स्थगित ठेवण्यात याव्यात अशा सूचना दिल्या.

बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले
बैठकीनंतर उल्हासनगर महापालिका प्रशासनाने संबंधित बांधकाम व्यावसायिकांना नोटिसा पाठवल्या आहेत. हस्तांतरणीय विकास हक्क जे वितरित करण्यात आले आहेत, त्यावर खरेदी-विक्री व्यवहार प्रतिबंधित करण्यात येत असल्याचे पालिकेने नोटिसीच्या माध्यमातून कळवले आहे. तसेच नोटिसीनंतरही व्यवहार झाल्यास कारवाई करण्यात येईल असा इशाराही दिला आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणून गेले आहेत.

Comments are closed.