इंग्लंडमध्ये सिद्ध करुन दाखवलं, तरी आशिया कपमध्ये शुभमन गिलऐवजी हा खेळाडू टीम इंडिया उपकर्णधार?

एशिया चषक 2025 साठी टीम इंडिया पथक: इंग्लंडविरुद्ध झालेल्या अलीकडच्या कसोटी मालिकेत शुभमन गिलने कर्णधार म्हणून आणि फलंदाजीतही उत्तम कामगिरी बजावली. काही दिवसांपूर्वी अशी बातमी समोर आली होती की, पुढील महिन्यात यूएईमध्ये होणाऱ्या आशिया कप टी-20 स्पर्धेसाठी त्याची भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी निवड होऊ शकते. मात्र, ताज्या अहवालानुसार गिलसोबतच आणखी एक खेळाडू उपकर्णधारपदासाठी स्पर्धेत असल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आशिया कपमध्ये खेळणार की नाही याबाबतही एक मोठी अपडेट समोर आली आहे.

अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निवड समिती 19 किंवा 20 ऑगस्ट रोजी आशिया कपसाठी संघ निवडू शकते. पण, हर्निया शस्त्रक्रियेनंतर बंगळुरूमध्ये नेटमध्ये फलंदाजी सुरू करणाऱ्या कर्णधार सूर्यकुमार यादवसह सर्व खेळाडूंचे वैद्यकीय बुलेटिन कधी पाठवते यावर ते अवलंबून असेल. पण 2024 मध्ये रोहित शर्माने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सूर्यकुमारला टी-20 संघाची कमान देण्यात आली. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने चमकदार कामगिरी केली. अशा परिस्थितीत, आगामी आशिया कपमध्येही तो कर्णधार होणार हे निश्चित आहे.

दुसरीकडे, इंग्लंडविरुद्धच्या भारताच्या घरच्या मालिकेत अक्षर पटेल उपकर्णधार होता, तर गेल्या वर्षी श्रीलंकेत, जेव्हा सूर्यकुमारला पहिल्यांदाच टी-20 संघाचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते, तेव्हा गिल उपकर्णधार होता. अशा परिस्थितीत, निवडकर्ते काय निर्णय घेतात हे पाहणे मनोरंजक असेल.

टॉप ऑर्डरची निवड करणे मोठे आव्हान

असे मानले जाते की, निवड समिती आशिया कपसाठी संघात जास्त बदल करू इच्छित नाही, कारण अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या हे टॉप-5 तगडे खेळाडू आहेत, जे उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. या प्रकरणाची माहिती असलेल्या बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, ‘अभिषेक शर्मा हा गेल्या आयसीसी रँकिंगमध्ये जगातील नंबर वन टी-20 फलंदाज आहे. संजू सॅमसनने गेल्या हंगामात फलंदाजी आणि विकेटकीपिंग दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे हा निर्णय घेणे कठीण होईल, परंतु सध्याचा फॉर्म पाहता (कसोटीत जरी) शुभमनलाही दुर्लक्षित करता येणार नाही. आयपीएलमध्ये त्याची कामगिरीही चांगली होती. निवडकर्त्यांसाठी समस्या अशी आहे की टॉप ऑर्डरमध्ये अनेक चांगले खेळाडू आहेत.’

बुमराहच्या खेळण्याबाबतची ‘ही’ अपडेट

बुमराहबद्दल एक मोठी अपडेट आली आहे की, तो आशिया कपमध्ये खेळण्यास तयार आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. अशा परिस्थितीत, बुमराह आणि अर्शदीप सिंग यांनी आशिया कपसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून प्रसिद्ध कृष्णा आणि तरुण वेगवान गोलंदाज हर्षित राणा यांच्यात स्पर्धा आहे. प्रसिद्ध कृष्णाने आयपीएल 2025 मध्ये चांगली कामगिरी करताना 25 विकेट्स घेतल्या.

हे ही वाचा –

Team India Squad For Asia Cup 2025 : सिराज, जैस्वाल, राहुल बाहेर; गिल, संजू, बुमराहसह ‘या’ इतरांना संधी; कशी असणार आशिया कपसाठी टीम इंडिया?

आणखी वाचा

Comments are closed.