समझो हो ही गया…! स्मृती मंधानाच्या लग्नाआधी टीम इंडियाच्या सहकाऱ्यांचा जल्लोष, पाहा VIDEO
भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि स्टार ओपनर स्मृती मंधाना हिच्यासाठी हा काळ खास ठरत आहे. नुकत्याच संपलेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करत भारताला विजेतेपद मिळवून देण्यात मंधानाने मोलाची भूमिका बजावली. आयसीसीकडून ‘प्लेअर ऑफ द मंथ’चा सन्मान मिळाल्यानंतर आता तिच्या आयुष्यात आणखी एक मोठा टप्पा येत आहे.
स्मृती 23 नोव्हेंबर रोजी आपल्या प्रियकर पलाश मुच्छलसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. त्याआधीच सांगलीतील मंधानाच्या घरी उत्सवाचे वातावरण रंगले आहे. भारतीय संघातील खेळाडू तिच्या घरी दाखल होत असून, लग्नाच्या रितीरिवाजांना सुरुवात झाली आहे.
जेमिमा रॉड्रिग्सने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या रीलमध्ये स्मृती, श्रेयंका पाटील, राधा यादव आणि अरुंधती रेड्डी ‘लगे रहो मुन्नाभाई’मधील लोकप्रिय ‘समझो हो ही गया…’ या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांकडून मोठी पसंती मिळत आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्मृती आणि पलाश यांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा देत खास पत्र पाठवले आहे. वर्ल्डकप जिंकल्यानंतर स्मृतीने ‘7 लोक कल्याण मार्ग’ येथे मोदींची भेट घेतली होती. मोदींनी स्मृतीच्या फलंदाजीचे तसेच पलाशच्या संगीतक्षेत्रातील कामगिरीचे कौतुक केले.
स्मृतीचा होणारा पती पलाश मुच्छल हा सुप्रसिद्ध गायिका पलक मुच्छलचा धाकटा भाऊ असून संगीतकार, चित्रपट निर्माता आणि गीतकार म्हणून बॉलीवूडमध्ये सक्रिय आहे. 2019 पासून दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत. वर्ल्डकप विजयानंतर पलाशने हातावर स्मृतीच्या नावाचा टॅटू काढत तिच्याबद्दलचं प्रेम व्यक्त केले होते.
मध्य प्रदेशातील इंदूरचा रहिवासी असलेल्या पलाशसोबतच्या विवाहानंतर स्मृती इंदूरची सून होणार आहे. काही आठवड्यांपूर्वी आयोजित कार्यक्रमात पलाशने लग्नाचे संकेत दिल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली होती.
Comments are closed.