IPL दरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का! आयसीसीनं सुनावली मोठी शिक्षा

भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया एकदिवसीय तिरंगी मालिका खेळत आहे. टीम इंडियाने या मालिकेत आतापर्यंत 2 सामने खेळले आहेत. दोन्ही सामने जिंकण्यात यश मिळवले आहे. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा 9 विकेट्सने पराभव केला, तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 15 धावांनी पराभव केला. तर, आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यानंतर, टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.

एकदिवसीय तिरंगी मालिकेचा पहिला सामना 27 एप्रिल रोजी यजमान श्रीलंका आणि भारत यांच्यात कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात आला. पावसामुळे हा सामना 39-39 षटकांचा होता, जो टीम इंडियाने 9 विकेट्सने एकतर्फी जिंकला. तर, या सामन्यात, भारतीय महिला संघाला 29 एप्रिल रोजी स्लो ओव्हर रेटमुळे आयसीसीकडून दंड ठोठावण्यात आला. आयसीसीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खेळाडू आणि संघ सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी आयसीसी आचारसंहितेच्या कलम 2.22 अंतर्गत, खेळाडूंना दिलेल्या वेळेत टाकण्यात अपयशी ठरलेल्या प्रत्येक षटकासाठी त्यांच्या सामन्याच्या मानधनाच्या पाच टक्के दंड आकारला जातो.

भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने स्लो ओव्हर रेटसाठी आयसीसीने लावलेला दंड स्वीकारला आहे. त्यानंतर या प्रकरणात पुढील औपचारिक सुनावणी होणार नाही. महिला एकदिवसीय विश्वचषक 2025च्या तयारी लक्षात घेऊन टीम इंडियासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. आता भारतीय संघाला या स्पर्धेत त्यांचा पुढील सामना 4 मे रोजी यजमान श्रीलंका महिला संघाविरुद्ध खेळायचा आहे.

Comments are closed.