पराभवाची हॅट्ट्रिक, पण खेळ अजून संपला नाही! टीम इंडियाच्या आशा जिवंत, सेमीफायनलचं गणित बदलणार ‘
ICC महिला विश्वचषक 2025 उपांत्य फेरीची परिस्थिती टीम इंडिया : आयसीसी महिला विश्वचषक 2025 मध्ये आतापर्यंत 20 सामने खेळले गेले आहेत. रविवारी उशिरा झालेल्या सामन्यात इंग्लंडने भारताला केवळ 4 धावांनी (England Beat India by 4 Runs) पराभूत केलं. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा हा सलग तिसरा पराभव ठरला. या विजयानंतर इंग्लंडने सेमीफायनलमध्ये आपली जागा निश्चित केली आहे.
पराभवाची हॅट्ट्रिक, पण खेळ अजून संपला नाही!
भारताने विश्वचषकाची सुरुवात दोन दमदार विजयांसह केली होती, पण त्यानंतर सलग तीन सामने गमावले. भारताने आतापर्यंत 5 पैकी 2 सामने जिंकले असून 3 हरले आहेत. त्यामुळे भारताच्या खात्यावर सध्या 4 गुण आहेत आणि संघ पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. इंग्लंडने 5 पैकी 4 सामने जिंकले आणि एक सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे इंग्लंडकडे 9 गुण आहेत आणि त्यांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्चित केला आहे.
टीम इंडियाच्या आशा जिवंत, सेमीफायनलचं गणित बदलणार ‘हे’ 3 समीकरणं (Team India Semi Final Scenario)
भारताने आतापर्यंत 5 सामने खेळले असून, त्यातील दोन जिंकले आणि तीन हरले आहेत. टीम इंडियाचा नेट रनरेट +0.526 असा आहे. भारताचे अजून दोन सामने न्यूजीलंड आणि बांगलादेशविरुद्ध बाकी आहेत.
पहिलं समीकरण : जर भारताने आपले उरलेले दोन्ही सामने (न्यूजीलंड आणि बांगलादेशविरुद्ध) जिंकले, तर तो थेट सेमीफायनलमध्ये पोहोचेल.
दुसरं समीकरण : जर भारताचा 23 ऑक्टोबरला न्यूजीलंडविरुद्ध पराभव झाला, तर मग भारताला अपेक्षा ठेवावी लागेल की कीवी संघ इंग्लंडविरुद्धचा शेवटचा सामना हरावा. त्यानंतर भारताने बांगलादेशवर विजय मिळवला, तरही भारत सेमीफायनलमध्ये पोहोचू शकेल.
तिसरं समीकरण : भारताने जर न्यूजीलंडचा पराभव केला, पण शेवटच्या सामन्यात बांगलादेशकडून हरला, आणि त्याच वेळी न्यूजीलंडने इंग्लंडचा पराभव केला, तर भारत आणि न्यूजीलंड या दोघांमध्ये नेट रनरेटवरून सेमीफायनलचं तिकीट ठरेल.
तीन संघांनी सेमीफायनल गाठलं
ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड महिला विश्वचषक उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. ऑस्ट्रेलियाने पाचपैकी चार सामने जिंकले आहेत, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. ऑस्ट्रेलिया नऊ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. इंग्लंडही नऊ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेने आठ गुणांसह उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले आहे. आता चौथ्या स्थानासाठी भारत आणि न्यूजीलंडमध्ये स्पर्धा रंगणार आहे. भारताचा पुढचा सामना म्हणजेच करो या मरो कारण त्यावरच ठरणार आहे, टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचते की नाही.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.