श्रीलंकेविरुद्ध भारताची विजयी घौडदौड; टी20 मध्ये 5-0 चा ऐतिहासिक प्रयत्न

भारतीय महिला क्रिकेट संघाने आपल्या आक्रमक खेळाची छाप कायम ठेवत श्रीलंकेविरुद्ध मंगळवारी होणाऱ्या पाचव्या आणि अंतिम महिला टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात विजय मिळवून पाच सामन्यांच्या मालिकेत 5-0 असा ऐतिहासिक क्लीन स्वीप करण्याचा निर्धार केला आहे. जर भारताने हा सामना जिंकला, तर टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्ध प्रथमच 5-0 अशी मालिका जिंकण्याचा पराक्रम भारतीय संघाच्या नावावर नोंदवला जाईल. यापूर्वी 2018 मध्ये दोन्ही संघांमध्ये झालेल्या पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने 4-0 अशी आघाडी घेतली होती, मात्र एक सामना अनिर्णित राहिला होता.

ही मालिका पुढील वर्षी जून-जुलैमध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या महिला टी20 विश्वचषकाच्या तयारीचा महत्त्वाचा भाग मानली जात आहे. श्रीलंकेविरुद्धची मालिका संपल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दौऱ्यावर तीन-तीन टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे.

2024च्या टी20 विश्वचषकात गट टप्प्यातून बाहेर पडल्यानंतर भारतीय संघाने आपल्या खेळात बदल केला असून अधिक आक्रमक शैली स्वीकारली आहे. या बदलाचा सकारात्मक परिणाम सध्याच्या मालिकेत स्पष्टपणे दिसून येतो. कर्णधार हरमनप्रीत कौरने सांगितले की, “ही मालिका आमच्यासाठी खूपच चांगली ठरली आहे. मागील विश्वचषकानंतर आम्ही आमचा स्तर उंचावण्याचा आणि टी20 क्रिकेटमध्ये अधिक आक्रमक होण्याचा निर्णय घेतला.”

पहिल्या तीन सामन्यांत भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे फलंदाजांवर फारसा ताण आला नाही. या सामन्यांत शेफाली वर्माने आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले. मात्र, क्षेत्ररक्षण हा भारतासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. मागील सामन्यातही दोन झेल सुटले, तर एक स्टंपिंगची संधी गमावली गेली.

या मालिकेत भारतासाठी अनेक सकारात्मक बाबी समोर आल्या आहेत. वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ठाकूरने जवळपास वर्षभरानंतर या फॉरमॅटमध्ये यशस्वी पुनरागमन केले, तर दीप्ती शर्मा सातत्याने प्रभावी कामगिरी करत आहे. 20 वर्षीय डावखुरी फिरकीपटू वैष्णवी शर्माने 5.73 च्या इकॉनॉमी रेटने चार बळी घेत आपली क्षमता दाखवून दिली आहे.

फलंदाजीमध्ये शेफाली वर्मा जबरदस्त फॉर्ममध्ये असून तिने चार सामन्यांत तीन अर्धशतके झळकावली आहेत. तिचा स्ट्राइक रेट 185.82 इतका आहे. उपकर्णधार स्मृती मानधनानेही चौथ्या सामन्यात 48 चेंडूंमध्ये 80 धावांची खेळी करत फॉर्ममध्ये पुनरागमन केले. चौथ्या सामन्यात शेफाली आणि मंधानाने पहिल्या विकेटसाठी 92 चेंडूंमध्ये 162 धावांची भागीदारी करत नवा विक्रम प्रस्थापित केला.

चौथ्या सामन्यात भारताने दोन बाद 221 धावा केल्या, तर श्रीलंकेनेही जोरदार प्रत्युत्तर देत सहा बाद 191 धावा केल्या. या कामगिरीमुळे श्रीलंकेचा आत्मविश्वास वाढला असून कर्णधार चमारी अटापट्टूच्या फॉर्ममध्ये येणे हे संघासाठी आशादायी ठरले आहे.

Comments are closed.