टीम इंडियाला नेट रन रेट ‘प्लस’मध्ये आणण्यासाठी करावं लागेल ‘हे’ काम; असं आहे सेमीफायनलचं समीकरण

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुपर ८ मध्ये मिळालेल्या मोठ्या पराभवानंतर आता भारतीय संघासमोर नेट रन रेटची (NRR) सर्वात मोठी अडचण निर्माण झाली आहे. टीम इंडियाला जर उपांत्य फेरीत (सेमीफायनल) आपले स्थान निश्चित करायचे असेल, तर नेट रन रेटमध्ये मोठी सुधारणा करावी लागेल. सध्या ७६ धावांनी झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाचा नेट रन रेट -३.८० आहे. भारताचे पहिले लक्ष्य झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात मोठा विजय मिळवून नेट रन रेट पॉझिटिव्ह करण्याचे असेल. याचे समीकरण नेमके काय आहे, ते जाणून घेऊया.

​सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २६ फेब्रुवारी रोजी चेपॉक मैदानावर झिम्बाब्वेविरुद्ध भिडणार आहे. सुपर ८ मधील या दोन्ही संघांचा हा दुसरा सामना असेल, जिथे दोन्ही संघ पराभव पदरी घेऊन मैदानात उतरतील. भारताला झिम्बाब्वेविरुद्ध प्रथम गोलंदाजी करताना त्यांना कमी धावसंख्येवर रोखावे लागेल. जर भारतीय गोलंदाजांनी झिम्बाब्वेला १५० धावांवर रोखले, तर टीम इंडियाला हे लक्ष्य ११ षटकांच्या आत गाठावे लागेल. तसेच, जर झिम्बाब्वेने बोर्डावर १८० धावा लावल्या, तर भारताला ७० चेंडूंच्या आत यशस्वी धावपाठलाग करावा लागेल. याउलट, जर टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करून २०० धावांचा डोंगर उभा केला, तर झिम्बाब्वेला १३० धावांच्या आसपास रोखावे लागेल. या स्थितीमध्येच झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यानंतर टीम इंडियाचा नेट रन रेट पॉझिटिव्ह होऊ शकतो.

​झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ सुपर ८ मधील आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात असेल. भारताचे प्राथमिक लक्ष्य हा सामना जिंकून आपल्या खात्यात २ गुण जमा करण्याचे असेल. सध्या भारतीय संघ शून्य गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. जर भारताला झिम्बाब्वेविरुद्ध विजय मिळवायचा असेल, तर खेळाडूंना उत्तम कामगिरी करावी लागेल आणि प्लेइंग ११ मध्ये काही महत्त्वाचे बदल करावे लागतील. तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा यांचा खराब फॉर्म सध्या भारतीय संघासाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरत आहे.

Comments are closed.