टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी टीम इंडियाच्या नव्या जर्सीचं अनावरण; पहिली झलक समोर

भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली 7 फेब्रुवारीपासून पुढील वर्षी टी20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. काही दिवसांपूर्वी आयसीसीने या स्पर्धेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाची डाव संपल्यानंतर बीसीसीआयने डिफेंडिंग चॅम्पियन टीम इंडियाची टी20 विश्वचषक 2026 साठीची नवी जर्सी लाँच केली.

टी20 विश्वचषक 2026 साठीच्या टीम इंडियाच्या जर्सीकडे पाहिल्यास कॉलरमध्ये तिरंग्याचे रंग स्पष्ट दिसतात. बॉर्डरवर केशरी रंगाची झाक दिसते तर समोरच्या बाजूला फिकट आणि गडद निळ्या रेषांचा सुंदर संगम पाहायला मिळत आहे.
या जर्सीवर दोन स्टारही आहेत, ज्याचा अर्थ टीम इंडियाने दोन वेळा टी20 विश्वचषक जिंकला आहे. 2007 मध्ये एम.एस. धोनीच्या नेतृत्वाखाली आणि 2024 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली.

जर्सी लॉन्चच्या वेळी कर्णधार रोहित शर्मा आणि तिलक वर्मा हे दोघेही उपस्थित होते.

टी20 विश्वचषक 2026 मध्ये टीम इंडिया आपला पहिला सामना 7 फेब्रुवारीला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळणार आहे. त्यानंतर 12 फेब्रुवारीला दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये नामिबियाविरुद्ध दुसरा सामना रंगणार आहे.

ग्रुप-ए मधील तिसरा सामना 15 फेब्रुवारीला प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर होईल. तर ग्रुप स्टेजमधील अखेरचा सामना 18 फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये नेदरलँड्सविरुद्ध होणार आहे.

ग्रुप स्टेजमधील टीम इंडियाचे सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होतील.

Comments are closed.