आता थांबायचं नाय, दमायचं नाय! वर्षभर हिंदुस्थानी संघाचा नॉनस्टॉप मॅरेथॉन हंगाम

हिंदुस्थानी क्रिकेट संघासाठी पुढील 12 महिने अक्षरशः मॅरेथॉनसारखे नॉनस्टॉप कसोटी पाहणारे ठरणार आहेत. न थकता, न दमता सतत मैदानावर उतरायचे आणि प्रत्येक मालिकेत सर्वोत्तम कामगिरी करायची, असे कठीण आव्हान संघासमोर उभे ठाकले आहे. आयर्लंड, इंग्लंड, श्रीलंका, झिम्बाब्वे, बांगलादेश, न्यूझीलंड अशा परदेशी मालिकांबरोबरच आशियाई क्रीडा स्पर्धा आणि घरच्या मालिकांचा तुफान कार्यक्रम संघाची वाट पाहतोय. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टी-20 संघ जुलै-ऑगस्टमध्ये श्रीलंकेत तीन टी-20 सामने खेळण्याची शक्यता आहे.

इंग्लंड दौऱयापूर्वी आयर्लंडचा स्टॉप

हिंदुस्थानचा संघ 1 ते 19 जुलैदरम्यान इंग्लंड दौऱयावर जाणार असून तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामने खेळणार आहे. या दौऱयाच्या वाटेत डब्लिनमध्ये आयर्लंडविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका आयोजित करण्याबाबत चर्चा सुरू आहे. बीसीसीआयने यापूर्वी 2018, 2022 आणि 2023 मध्ये आयर्लंडमध्ये छोटय़ा मालिकांना पाठिंबा दिला आहे. ही मालिका जूनच्या अखेरीस, इंग्लंड दौऱयापूर्वी होण्याची शक्यता आहे.

श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश मालिकांची गर्दी

श्रीलंका दौऱयापूर्वी हिंदुस्थान अफगाणिस्तानविरुद्ध 10 ते 20 जूनदरम्यान एक कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळू शकतो. त्यानंतर सप्टेंबरमध्ये यूएईमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध तीन टी-20 सामने होण्याची शक्यता आहे. त्याच महिन्यात बांगलादेशविरुद्ध तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 मालिकाही नियोजित आहे. मात्र दोन्ही देशांतील राजकीय तणावामुळे या मालिकेसाठी पेंद्र सरकारची मंजुरी आवश्यक ठरणार आहे.

झिम्बाब्वे दौरा आणि वेस्ट इंडीजचा हिंदुस्थान दौरा

सप्टेंबरमध्ये झिम्बाब्वेचा छोटा दौरादेखील चर्चेत आहे. याच काळात वेस्ट इंडीज संघ हिंदुस्थानात तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामने खेळण्यासाठी येणार आहे. ही मालिका ऑक्टोबरपर्यंत रंगण्याची शक्यता आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धा आणि न्यूझीलंडचा दौरा

19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरदरम्यान जपानमधील नागोया येथे आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत क्रिकेट टी-20 स्वरूपात खेळली जाणार असून हिंदुस्थान विद्यमान सुवर्णपदक विजेता आहे. याच काळात एकदिवसीय संघ वेस्ट इंडीजविरुद्ध खेळण्याची शक्यता आहे. यानंतर 18 ऑक्टोबरपासून हिंदुस्थानचा न्यूझीलंड दौरा सुरू होईल. या दौऱयात पाच एकदिवसीय, पाच टी-20 आणि दोन कसोटी सामने होणार आहेत. डिसेंबरच्या सुरुवातीला संघ मायदेशी परतेल आणि श्रीलंकेविरुद्ध तीन एकदिवसीय व तीन टी-20 सामने खेळेल. त्यानंतर जानेवारी-फेब्रुवारी 2027 मध्ये
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी आणि मार्च ते मेदरम्यान आयपीएलचा 20वा हंगाम रंगणार आहे.

Comments are closed.