दोन स्टार खेळाडू OUT, तर… न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी असा असेल टीम इंडियाचा Squad
टीम इंडिया वनडे संघ विरुद्ध न्यूझीलंड मालिका: भारतीय क्रिकेट संघाची पुढील आंतरराष्ट्रीय मालिका न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. भारत दौऱ्याची सुरुवात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेने होईल. या मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारी रोजी वडोदऱ्यातील बीसीए स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. बीसीसीआय जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात संघाची घोषणा करू शकते. या वनडे संघात दोन मोठे बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात जखमी झाला होता. त्याच्या पायाला दुखापत झाल्याने तो केवळ कसोटीच नाही, तर संपूर्ण वनडे मालिकेतूनही बाहेर पडला. मात्र त्याने टी20 मालिकेत पुनरागमन केले, पण अपेक्षित कामगिरी करता आली नाही. याचाच परिणाम म्हणून त्याची टी20 वर्ल्ड कप संघात निवड झाली नाही.
श्रेयस अय्यरची पुनरागमनाची शक्यता?
उपकर्णधार श्रेयस अय्यरला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गंभीर दुखापत झाली होती. सध्या तो बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पुनर्वसन (रिहॅब) प्रक्रियेत आहे. दिलासादायक बाब म्हणजे अय्यरने नेटमध्ये फलंदाजीचा सराव सुरू केला आहे. त्यामुळे त्याच्या लवकरच संघात पुनरागमनाची आशा निर्माण झाली आहे.
ईशान किशन आणि पडिक्कलसाठी मार्ग कठीण
ईशान किशन आणि देवदत्त पडिक्कल विजय हजारे ट्रॉफीत जबरदस्त फॉर्ममध्ये असले तरी सध्या त्यांना वनडे संघात स्थान मिळणे कठीण दिसत आहे. ईशानची टी20 वर्ल्ड कप आणि न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी निवड झाली आहे, मात्र वनडे संघासाठी त्याला आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते. दुसरीकडे, विजय हजारेत सलग दोन शतके झळकावूनही पडिक्कलची वनडे संघात निवड होण्याची शक्यता कमीच मानली जात आहे.
तिलक वर्मा आणि ध्रुव जुरेल बाहेर?
शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर संघात परतल्यास तिलक वर्मा आणि ध्रुव जुरेल यांना बाहेर बसावे लागू शकते. संघात दोन यष्टीरक्षक म्हणून केएल राहुल आणि ऋषभ पंत यांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे ऋतुराज गायकवाडचा बॅकअप मानला जाणारा तिलक वर्माही संघाबाहेर जाऊ शकतो.
पांड्या आणि बुमराहला विश्रांती
हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांना या वनडे मालिकेतून विश्रांती दिली जाण्याची दाट शक्यता आहे. टी20 वर्ल्ड कपसाठी हे दोघेही अत्यंत महत्त्वाचे खेळाडू असल्याने वर्कलोड मॅनेजमेंटच्या दृष्टीने बीसीसीआय त्यांना आराम देऊ शकते. त्यांनी भारताच्या मागील दोन वनडे मालिकांतही सहभाग घेतलेला नाही, आणि ही परंपरा पुढेही सुरू राहण्याची शक्यता आहे.
अक्षर पटेल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळला नव्हता. त्याला विश्रांती देण्यात आली की संघातून वगळण्यात आले, याबाबत बीसीसीआयने कोणतेही अधिकृत कारण सांगितले नव्हते. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतही तो बाहेर राहू शकतो. रवींद्र जडेजाला मात्र कदाचित शेवटची संधी मिळू शकते. या फॉर्मेटमध्ये गेल्या काही सामन्यांत त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले होते आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धही तो गोलंदाजीत प्रभाव पाडू शकला नव्हता.
न्यूझीलंडविरुद्ध भारताचा संभाव्य एकदिवसीय संघ (Ind vs NZ ODI Series Squad) –
शुभमन गिल (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), विराट कोहली, रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, नितीशकुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.