T20 WC: भारत आतापर्यंत कितीदा खेळला सेमीफायनलमध्ये? विजयाचा रेकॉर्ड आणि फायनलचे तिकीट, वाचा सविस्तर

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मध्ये भारत उपांत्य फेरीत पोहोचला आहे. त्यांनी सुपर-८च्या सामन्यात झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजला पराभूत करत आपली जागा निश्चित केली. रविवारी (१ मार्च) वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने १९६ धावांचे लक्ष्य चार चेंडू आणि ५ विकेट्स शिल्लक राखत गाठले. त्यामध्ये संजू सॅमसनने नाबाद ९७ धावा केल्या. लागोपाठ दुसरा सुपर-८चा सामना जिंकल्याने भारताचे पुन्हा विश्वविजेत्याचे स्वप्न कायम आहे. आता उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी आहे.
पुरुष टी२० विश्वचषकाची सुरूवात २००७मध्ये झाली असून सध्या त्याची दहावी आवृत्ती खेळली जात आहे. यामध्ये भारत सहावेळा उपांत्य फेरीत पोहोचला आहे. भारताने २००७, २०१४, २०१६, २०२२, २०२४ आणि २०२६मध्ये उपांत्य फेरी गाठली आहे. यामधील २००७, २०१४ आणि २०२४ असे तीन उपांत्य फेरीचे सामने जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. यामधील केवळ २००७ आणि २०२४मध्ये भारत विश्वविजेता ठरला.
टी२० विश्वचषकातील भारताचे उपांत्य फेरीतील कामगिरी-
२००७ – एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारत उपांत्य फेरीत पोहोचला आणि अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत करत विजेतेपद जिंकले.
२०१४- भारत अंतिम फेरीत पोहोचला, मात्र श्रीलंकेकडून पराभूत व्हावे लागले.
२०१६ – भारत घरच्या मैदानावर उपांत्य फेरीत खेळला आणि मुंबईमध्ये झालेल्या त्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात भारत ७ विकेट्सने हरला.
२०२२ – रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत उपांत्य फेरीत इंग्लंडकडून हरला.
२०२४ – रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने दुसऱ्यांदा टी२० विश्वचषक जिंकण्याची कामगिरी केली. त्यावेळी भारताने उपांत्य सामन्यात इंग्लंडला आणि अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले होते.
२०२६ – सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारत पुन्हा एकदा उपांत्य फेरीत पोहोचला आहे. त्यामध्ये पुन्हा एकदा इंग्लंडविरुद्ध सामना आहे. यामुळे यंदा कोण बाजी मारणार हे पाहणे चुरशीचे ठरेल.
भारताव्यतिरिक्त पाकिस्तान आणि इंग्लंड यांनीही प्रत्येकी सहा-सहा वेळा टी२० विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली आहे. पाकिस्तानने २००७, २००९, २०१०, २०२१ आणि २०२२मध्ये उपांत्य सामने खेळले असून २००९मध्ये त्यांनी विजेतेपद पटकावले. इंग्लंड २०१०, २०१६, २०२१, २०२२, २०२४ आणि २०२६ च्या स्पर्धेत अंतिम चारमध्ये पोहोचले आहेत. ते २०१० आणि २०२२मध्ये विश्वविजेते झाले आहेत.
Comments are closed.