टीम इंडियाच्या खेळाडूंनी हस्तांदोलन टाळलं; पाकिस्तानची झोंबली, BCCI ची पहिली प्रतिक्रिया, नियम

टीम इंडिया प्लेयर नो शेक हँडवरील बीसीसीआय: आशिया चषकात (Asia Cup 2025) 14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 7 विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला. या सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंनी सामना संपल्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन केलं नाही. टीम इंडियाच्या खेळाडूंनी हस्तांदोलन न केल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची चांगलीच झोंबली आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने थेट आयसीसीकडे तक्रार करत सामन्यातील मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. मात्र पाकिस्तान बोर्डाची ही मागणी आयसीसीने फेटाळून लावली. टीम इंडियाच्या खेळाडूंनी हस्तांदोलन करण्यामध्ये अँडी पायक्रॉफ्ट यांची भूमिका मोठी नव्हती, असं आयसीसीनं म्हटलं आहे. या सगळ्यात आता बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यांनी देखील हस्तांदोलन प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

हस्तांदोलन प्रकरणावर बीसीसीआयची पहिली प्रतिक्रिया-

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, जर तुम्ही नियमावली वाचली तर, विरोधी संघासोबत हस्तांदोलन करण्याबाबत कोणताही नियम नाही. ही एक सद्भावनापूर्ण कृती आहे आणि एक प्रकारची परंपरा आहे. हस्तांदोलन करायलाच हवे, याबाबत कोणताही कायदा नाही, असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले.

काय सांगतो ICC आणि ACC चा नियम?

क्रिकेटच्या कोणत्याही नियमपुस्तिकेत सामना संपल्यानंतर हस्तांदोलन अनिवार्य आहे, असे लिहिलेले नाही. हस्तांदोलन हा कसलाही नियम नसून खेळभावनेचा (Sportsmanship of Cricket) भाग मानला जातो. त्यामुळे जवळजवळ प्रत्येक सामन्यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांना भेटतात. हस्तांदोलन करण्याचा नियमच नाही, त्यामुळे टीम इंडियावर दंडाचा किंवा कारवाई प्रश्नच उद्भवत नाही. मात्र, जाणूनबुजून प्रतिस्पर्धी संघाशी हस्तांदोलन करण्यास नकार दिल्यास, त्याला खेळभावनेच्या विरुद्ध कृती मानले जाते.

भारत-पाकिस्तानचा सामना कसा राहिला?

पाकिस्ताननं भारतासमोर 128 धावांचं सोपं लक्ष्य ठेवलं होतं. भारतानं हे आव्हान 16 व्या षटकातच पार केलं आणि पाकिस्तानविरुद्ध दणदणीत विजय मिळवला. सलामीच्या अभिषेक शर्मानं अवघ्या 13 चेंडूत चार चौकार आणि 2 षटकारांसह 31 धावा फटकावल्या. पण शुभमन गिल 10 धावांवर बाद झाला. त्यानंतर तिलक वर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादवनं तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी साकारली. सूर्यकुमारनं नाबाद 47 तर तिलक वर्मानं 31 धावा केल्या. त्याआधी कुलदीप यादव आणि अक्षर पटेलच्या फिरकीसमोर पाकिस्तानी फलंदाजांनी अक्षरश: गुडघे टेकले.पाकिस्तानला 20 षटकात 9 बाद 127 धावांचीच मजल मारता आली. कुलदीप यादव आणि अक्षर पटेल या फिरकी जोडगोळीनं अवघ्या 36 धावात 5 फलंदाजांना माघारी धाडलं. तर जसप्रीत बुमरानं 2 आणि हार्दिक पांड्या, वरुण चक्रवर्तीनं प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहाननं सर्वाधिक 40 धावा केल्या. त्यानंतर एकाही फलंदाजाला फारसा प्रभाव पाडता आला नाही.

संबंधित बातमी:

Asia Cup 2025 Pak vs UAE: आम्ही आशिया चषक खेळणार नाही; आता पाकिस्तानची जिद्द, स्पर्धेतून माघार घेतल्यास समीकरण काय?

आणखी वाचा

Comments are closed.