ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात 'करो या मरो' लढाईसाठी भारत सज्ज, संघात दोन बदल संभव

पर्थमधील अपयशानंतर आता भारताची नजर दुसऱ्या वनडे सामन्यावर आहे. रविवारी (19 ऑक्टोबर) झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून 7 विकेट्सनी पराभवाचा सामना करावा लागला होता. पावसामुळे प्रभावित झालेल्या सामन्यात भारताने केवळ 26 षटकांत 136 धावा करत 9 गडी गमावले. डीएलएस प्रणालीनुसार मिळालेलं 131 धावांचं लक्ष्य ऑस्ट्रेलियाने सहज गाठलं.

आता भारताला गुरुवारी (23 ऑक्टोबर) एडिलेड ओव्हलवर दुसऱ्या वनडे सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे, अन्यथा मालिका गमवावी लागेल. त्यामुळे हा सामना भारतासाठी ‘करो या मरो’चा ठरणार आहे.

पहिल्या सामन्यात प्रभाव टाकू न शकलेल्या हर्षित राणाच्या जागी प्रसिध कृष्णाला संधी दिली जाऊ शकते. हर्षितला फलंदाजी व गोलंदाजीमध्ये प्रभाव टाकता आला नाही, ज्यामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे. दुसरीकडे, स्पिन विभागात कुलदीप यादवची संघात पुनरागमन होण्याची शक्यता आहे. वॉशिंग्टन सुंदर किंवा नितीश कुमार रेड्डी यापैकी एकाला बाहेर बसवून त्याला संधी मिळू शकते.

पहिल्या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली फारशी चमक दाखवू शकले नाहीत. रोहितने 8 धावा तर कोहली शून्यावर माघारी परतला. तरीही हे दोघंही दुसऱ्या सामन्यात आपापल्या ठराविक स्थानांवर (रोहित ओपनिंग, कोहली क्रमांक 3) फलंदाजी करत राहणार आहेत.

दुसऱ्या वनडेसाठी संभाव्य भारतीय संघ-

रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्ंधर), विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टिरक्षक), नितीश कुमार रेड्डी/वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा.

यशस्वी जयसवाल आणि ध्रुव जुरेल सध्या संघात असले तरी, फलंदाजी विभागात दुखापतीसारखी कोणतीही अडचण न आल्यास त्यांचं खेळणं सध्या अपेक्षित नाही.

एडिलेडमध्ये होणाऱ्या या दुसऱ्या सामन्यात भारताला विजयाची नितांत गरज आहे आणि त्यासाठी अनुभव आणि नव्या दमाच्या खेळाडूंमध्ये योग्य समन्वय साधणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments are closed.