टी-20 वर्ल्ड कपपूर्वी मोठी परीक्षा! जानेवारीत टीम इंडिया खेळणार 8 महत्त्वाचे सामने
नवीन वर्षाचे आगमन होताच टीम इंडियानेही नव्या आव्हानांसाठी सज्ज होण्यास सुरुवात केली आहे. 2025 मधील चढउतार मागे टाकत भारतीय संघ जानेवारी 2026 मध्ये दमदार सुरुवात करण्याच्या तयारीत आहे. वर्षाच्या पहिल्याच महिन्यात टीम इंडियासमोर मोठे आव्हान असणार असून, जानेवारीमध्ये भारत एकूण आठ आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे.
2026 ची सुरुवात भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेने होणार आहे. प्रथम तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाईल. या मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारी रोजी वडोदरा येथे होणार आहे. दुसरा वनडे 14 जानेवारीला राजकोटमध्ये, तर तिसरा आणि अंतिम सामना 18 जानेवारीला इंदौरमध्ये खेळवला जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र, बीसीसीआयची निवड समिती शनिवार ते रविवारदरम्यान संघ जाहीर करेल, अशी शक्यता आहे. या मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा पुन्हा एकदा निळ्या जर्सीत दिसणार असून, त्यांच्या कडून मोठ्या खेळींची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
वनडे मालिकेनंतर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेचा पहिला सामना 21 जानेवारीला नागपूर येथे होईल. दुसरा सामना 23 जानेवारीला रायपूरमध्ये, तिसरा 25 जानेवारीला गुवाहाटीमध्ये खेळवला जाईल. चौथा सामना 28 जानेवारीला विशाखापट्टणम येथे, तर पाचवा आणि अंतिम सामना 31 जानेवारीला तिरुवनंतपुरम येथे होणार आहे. या मालिकेसह भारत–न्यूझीलंड दौऱ्याचा आणि जानेवारी महिन्यातील क्रिकेट अॅक्शनचा समारोप होईल.
जानेवारीनंतर फेब्रुवारी महिना टीम इंडियासाठी आणखी महत्त्वाचा ठरणार आहे. कारण याच महिन्यात आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2026 ची सुरुवात होणार आहे. 7 फेब्रुवारीला पहिला सामना खेळवला जाणार असून, पहिल्याच दिवशी भारत मैदानात उतरेल. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारताचा सामना यूएसएविरुद्ध होणार आहे. विद्यमान विजेतेपद राखण्यासाठी टीम इंडिया पुन्हा एकदा इतिहास रचण्याच्या इराद्याने या स्पर्धेत उतरणार आहे.
Comments are closed.