आगरकरांना चुकीचं ठरवत शमी सज्ज, न्यूझीलंड मालिकेसाठी टीम इंडियात पुनरागमन?
नव्या वर्षात भारतीय क्रिकेट संघाची पहिली आंतरराष्ट्रीय मालिका न्यूझीलंडविरुद्ध खेळवली जाणार आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून, 11 जानेवारीपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांमध्ये आधी तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा शनिवारी, 3 जानेवारी रोजी होणार आहे.
सध्याच्या घडीला ही मालिका फार मोठी मानली जात नसली, तरी काही खेळाडूंसाठी ही संघनिवड निर्णायक ठरणार आहे. त्यातील सर्वात चर्चेत असलेलं नाव म्हणजे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी. शमीचा पुन्हा एकदा टीम इंडियात समावेश होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शनिवारी अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची ऑनलाइन बैठक होणार असून, या बैठकीत तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी संघ निवडला जाईल. निवड झालेल्या संघाची अधिकृत घोषणा बीसीसीआयच्या वेबसाइट आणि सोशल मीडियावर करण्यात येणार आहे. दरम्यान, या मालिकेसंदर्भात काही महत्त्वाच्या घडामोडी आधीच समोर आल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, रिषभ पंतला वगळलं जाऊ शकतं, तर हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह यांना वर्कलोड मॅनेजमेंटच्या कारणामुळे विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर मोहम्मद शमीच्या पुनरागमनाची चर्चा जोर धरू लागली आहे. मागील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर शमी भारतीय संघाबाहेर आहे. या दरम्यान त्याच्या फिटनेस आणि फॉर्मवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं. याच मुद्द्यावरून शमी आणि अजित आगरकर यांच्यात शाब्दिक वादही रंगला होता.
मात्र, गेल्या काही महिन्यांत शमीने देशांतर्गत क्रिकेटमधून आपल्या टीकाकारांना उत्तर दिलं आहे. रणजी ट्रॉफीच्या पहिल्या टप्प्यात त्याने सात डावांत 20 विकेट घेतल्या असून त्याची सरासरी 18.60 इतकी प्रभावी आहे. त्यानंतर सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत सात सामन्यांत 16 विकेट घेतल्या. जरी तो काहीसा महागडा ठरला असला, तरी त्याची लय स्पष्टपणे दिसून आली.
विजय हजारे ट्रॉफीत बंगालकडून खेळताना शमीने चार सामन्यांत आठ विकेट घेतल्या असून, तो पुन्हा एकदा प्रभावी गोलंदाज म्हणून दिसून येत आहे. फिटनेस आणि फॉर्म या दोन्ही आघाड्यांवर शमीने स्वतःला सिद्ध केल्यामुळे, यावेळी निवड समितीकडे त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचं ठोस कारण उरत नाही.
आगामी टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीच्या दृष्टीने काही प्रमुख गोलंदाजांना विश्रांती देण्यात येणार असल्यास, त्याजागी अनुभवी मोहम्मद शमीला संधी देणं निवड समितीसाठी योग्य पर्याय ठरू शकतो. त्यामुळे आज होणारी संघनिवड शमीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
Comments are closed.