ऋषभ पंतच नव्हे, ‘हे’ दोन स्टार खेळाडूही वनडेतून OUT, टीम इंडियात होणार मोठी उलथापालथ?
न्यूझीलंड वनडे मालिकेसाठी भारतीय संघ : नव्या वर्षात टीम इंडियाच्या आंतरराष्ट्रीय मोहिमेला 11 जानेवारीपासून सुरुवात होणार असून, भारताचा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. या दौऱ्याची सुरुवात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेने होईल. मात्र या मालिकेसाठी भारतीय संघाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात वनडे संघ जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधीच तीन खेळाडूंविषयी मोठे दावे समोर आले आहेत. स्टार विकेटकीपर ऋषभ पंतला वनडे संघातून वगळले जाण्याच्या चर्चांना वेग आला आहेच, पण आता आणखी दोन दिग्गज खेळाडू हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांना मालिकेतून विश्रांती दिली जाऊ शकते.
वनडे मालिकेत बुमराह-पांड्या का खेळणार नाहीत?
क्रिकबजच्या एका अहवालानुसार, 11 ते 18 जानेवारीदरम्यान होणाऱ्या तीन वनडे सामन्यांसाठी बुमराह आणि पंड्याची निवड केली जाणार नाही. आगामी टी20 वर्ल्ड कप 2026 लक्षात घेता या दोघांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा वर्ल्ड कप 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, बुमराह आणि पांड्या हे भारताचे सर्वात महत्त्वाचे खेळाडू मानले जात आहेत. 2024 मध्ये भारताला टी20 वर्ल्ड कप जिंकून देण्यात या दोघांची भूमिका निर्णायक ठरली होती. विशेषतः दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यातील त्यांची सामना जिंकवणारी गोलंदाजी आजही चर्चेत आहे.
बुमराह आणि पांड्या यांचा समावेश आधीच जाहीर झालेल्या टी20 वर्ल्ड कप संघात आहे. वनडे मालिकेत न खेळल्यानंतर मात्र हे दोघे 21 जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत पुनरागमन करतील. ही मालिका वर्ल्ड कपच्या तयारीसाठी दोन्ही संघांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही मालिका भारतातच खेळवल्या जाणार आहेत.
विजय हजारे ट्रॉफीत दिसू शकतो हार्दिक पांड्या
अहवालात असेही म्हटले आहे की, वनडे संघातून दूर राहूनही हार्दिक पंड्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभागी होऊ शकतो. तो विजय हजारे ट्रॉफीत बडोदा संघाकडून किमान दोन सामने खेळण्याची शक्यता आहे. यामागे बीसीसीआयचा आदेश कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे, ज्यानुसार सीनियर संघातील खेळाडूंना घरगुती स्पर्धांमध्ये खेळणे बंधनकारक आहे. मात्र वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला या नियमातून सूट देण्यात आली आहे.
ऋषभ पंतला मिळणार विश्रांती?
संघ निवडीबाबत बोलायचे झाल्यास, भारतीय वनडे संघाची घोषणा 3 किंवा 4 जानेवारी रोजी होऊ शकते. यावेळी निवड समितीची बैठक ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याची माहिती आहे. याच बैठकीत न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघ निवडला जाईल. दरम्यान, काही अहवालांनुसार ऋषभ पंतला वनडे संघातून वगळले जाऊ शकते. त्याच्या जागी ईशान किशन याला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत दमदार कामगिरीच्या जोरावर ईशानची टी20 वर्ल्ड कपसाठी आधीच निवड झाली आहे. त्यानंतर विजय हजारे ट्रॉफीत अवघ्या 34 चेंडूत शतक झळकावून त्याने वनडे संघात पुनरागमनासाठी जोरदार दावा ठोकला आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.