7 विजय आणि…. भारताचा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील टी20 रेकॉर्ड

क्रिकेटविश्वात भारतीय चाहते ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आला आहे. आज (८ मार्च) भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टी२० विश्वचषक २०२६च्या विजेतेपदाची लढत होणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. सामन्याची वेळ संध्याकाळी ७ वाजताची आहे. या स्टेडियमवर भारताने किती टी२० सामने खेळले आणि त्याचे निकाल काय लागले, हे एकदा जाणून घेऊ.

भारताने अहमदाबादच्या या स्टेडियमवर २०२३ मध्ये आयसीसी वनडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पराभवाचा सामना केला आहे, मात्र येथे टी२०मध्ये भारताची चांगली कामगिरी राहिली आहे. येथे भारताने १० सामने खेळले असून ७ सामने जिंकले आहेत. हे पराभव इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आले आहेत. २०२१ मध्ये इंग्लंडकडून दोनदा आणि २०२६ मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून (टी२० विश्वचषकाचा सुपर-८) एकदा भारताने येथे टी२० सामना गमावला आहे.

या मैदानावर भारताचा न्यूझीलंड विरुद्ध टी२० विक्रम उत्तम राहिला आहे. २०२३मध्ये खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला १६८ धावांनी पराभूत केले होते. त्यामध्ये शुबमन गिलने नाबाद १२६ धावा (६३ चेंडू) केल्या होत्या. त्यामुळे भारताने न्यूझीलंडला २३५ धावांचे लक्ष्य दिले होते. फलंदाजीबरोबर गोलंदाजीतही यजमानांनी उत्तम कामगिरी केली होती. त्यामध्ये हार्दिक पांड्याची गोलंदाजी प्रभावी ठरली. त्याने ४ षटकात १६ धावा देत ४ विकेट्स घेतल्या होत्या.

दवामुळे लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे ठरते, मात्र या स्टेडियमवर वेगळीच बाब आहे. येथे टी२०मध्ये खेळल्या गेलेल्या १३ पैकी ८ सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत.

टी२० विश्वचषकात भारताविरुद्ध न्यूझीलंडची कामगिरी उत्तम राहिली आहे. न्यूझीलंडने भारताविरुद्ध खेळलेले तिन्ही टी२० विश्वचषकाचे सामने जिंकले आहेत. तर आता न्यूझीलंडची भारताविरुद्धची या स्पर्धेतील कामगिरी आणि भारताची अहमदाबादमधील न्यूझीलंडविरुद्धची शेवटच्या टी२०मधील कामगिरी यावरून आजच्या सामन्याचा काय निकाल लागतो, हे पाहणे चुरशीचे ठरेल.

Comments are closed.