नव्या कर्णधारासह भारतीय संघ सज्ज; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना आज
टीम इंडिया नववर्षातील पहिला सामना 11 जानेवारी रोजी खेळणार आहे. या सामन्यापासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मायदेशात वनडे आणि टी-20 मालिका सुरू होणार आहे. त्याचवेळी अंडर-19 टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाली आहे.
अंडर-19 भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एकूण तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी आयुष म्हात्रेची भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली होती. मात्र दुखापतीमुळे आयुषला या मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे.
आयुषच्या अनुपस्थितीत आता वैभव सूर्यवंशी भारतीय अंडर-19 संघाचं नेतृत्व करणार आहे. वैभवसाठी ही मोठी संधी असून, तो पहिल्यांदाच कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेच्या अंडर-19 संघाचं नेतृत्व मुहम्मद बुलबुलिया करणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला अंडर-19 एकदिवसीय सामना शनिवारी, 3 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना दक्षिण आफ्रिकेतील बेनोनी येथील विलोमूर पार्क मैदानावर होणार आहे.
भारतीय वेळेनुसार सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल, तर टॉस 1 वाजता होणार आहे. या सामन्याचं थेट प्रक्षेपण टीव्हीवर होणार की नाही, याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. मात्र हा सामना चाहते JioHotstar अॅपच्या माध्यमातून मोबाईल आणि लॅपटॉपवर लाईव्ह पाहू शकतील.
दरम्यान, वैभव सूर्यवंशीने गेल्या काही महिन्यांत सातत्याने दमदार फलंदाजी करत लक्ष वेधून घेतलं आहे. आता फलंदाजीसह कर्णधारपदाची दुहेरी जबाबदारी तो कशी पार पाडतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
Comments are closed.