टीम इंडियाची रन मशीन स्मृती मानधना! शतक झळकावत रचला आणखी एक विश्वविक्रम

स्मृती मानधना आपल्या फलंदाजीने महिला वनडे वर्ल्ड कप 2025 मध्ये धुमाकूक घालत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यातही स्मृती मानधनाने अप्रतिम फलंदाजी करत शतक झळकावले आहे. वनडे करिअरमधील हे तिचे 14वे शतक ठरले आहे. या खेळी दरम्यान भारतीय संघाच्या उपकर्णधाराने आणखी एक जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे.

मंधानाने 95 चेंडूंचा सामना करत 109 धावांची दमदार खेळी केली. या खेळीत तिने 10 चौकार आणि 4 षटकार ठोकले. स्मृती मानधनाने पहिल्या विकेटसाठी प्रतिका रावलसह 212 धावांची विक्रमी भागीदारीही केली.

स्मृती मानधना वनडे फॉरमॅटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार ठोकणारी महिला फलंदाज ठरली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात तिने एकूण 4 षटकार ठोकले. या वर्षी आतापर्यंत स्मृती मानधनाने एकूण 29 षटकार लगावले आहेत. तिने लिझेल लीचा 8 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. लिझेलने 2017 मध्ये एकूण 28 षटकार ठोकले होते. स्मृती मानधनाच्या बॅटमधून आलेले हे या वर्षातील तिचे पाचवे शतक आहे.

स्मृती मानधनाने एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाचा जागतिक विक्रम आधीच आपल्या नावावर केला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात तिने सुरुवात थोडी संथ केली होती, पण एकदा क्रीजवर डोळे सरावल्यानंतर तिने कीवी गोलंदाजीवर अक्षरशः धुव्वा उडवला.

स्मृती मानधनाच्या वनडे करिअरमधील हे 14वे शतक आहे. एकदिवसीय फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत स्मृती मानधना आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. या बाबतीत तिने न्यूझीलंडच्या सूझी बेट्सला मागे टाकले आहे. मानधनाने प्रतिकासह मिळून भारतीय संघासाठी वर्ल्ड कपमध्ये कोणत्याही विकेटसाठीची सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

Comments are closed.