न्यूझीलंड विरुद्ध मालिकेसाठी या दिवशी होणार भारतीय संघाची घोषणा! गिल- अय्यरचे पुनरागमन होण्याची शक्यता
दक्षिण आफ्रिकेला वनडे आणि टी-20 मालिकेत धूळ चारल्यानंतर, भारतीय संघ आता न्यूझीलंडचे यजमानपद भूषवण्यासाठी तयार आहे. 2026 सालाची सुरुवात भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेने करणार आहे. या दौऱ्यात न्यूझीलंडचा संघ भारतासोबत 3 वनडे आणि 5 टी-20 सामने खेळणार आहे.
वनडे मालिकेत पुन्हा एकदा विराट कोहली आणि रोहित शर्मा आपल्या बॅटने मैदानात रंगत भरताना दिसतील. दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका न खेळू शकलेला शुबमन गिल (Shubman gill) आता पूर्णपणे फिट झाला आहे. त्याने सराव सुरू केला असून न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत तो कर्णधारपद भूषवणार आहे.
श्रेयस अय्यर (Shreyas iyer) संघात परतण्याची शक्यता आहे, पण त्यावर अद्याप सस्पेन्स कायम आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात क्षेत्ररक्षण करताना तो जखमी झाला होता.
बीसीसीआय न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी 3 किंवा 4 जानेवारीला भारतीय संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताने जबरदस्त प्रदर्शन केले होते. विराट कोहलीने 3 सामन्यांत 2 शतके आणि 1 अर्धशतक ठोकले होते. रोहित शर्माने आपल्या आक्रमक फलंदाजीने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना जेरीस आणले होते. कुलदीपच्या फिरकीची जादू चालली होती, त्याने 3 सामन्यांत 9 विकेट्स घेतल्या होत्या. भारतीय संघ आपल्या मायदेशात न्यूझीलंडविरुद्धही अशीच कामगिरी करण्यास उत्सुक आहे.
Comments are closed.