अमेरिका-इस्रायलचा तेहरानमधील विद्यापीठावर हल्ला! जशास तसे उत्तर देऊ, इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा इशारा
पश्चिम आशियातील युद्ध आता अत्यंत भीषण वळणावर पोहोचले असून, शनिवारी अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त सैन्याने इराणची राजधानी तेहरानमधील एका प्रसिद्ध विद्यापीठाला लक्ष्य केले आहे. इराण युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीवर (IUST) झालेल्या या हवाई हल्ल्यात विद्यापीठ परिसरातील इमारतींचे अतोनात नुकसान झाले असून, या घटनेने संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यानंतर इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी संताप व्यक्त केला असून, शत्रूला या कृत्याबद्दल जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या हवाई हल्ल्यात विद्यापीठाची मुख्य इमारत आणि प्रयोगशाळा ढिगाऱ्यात बदलल्या आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओंमध्ये विद्यापीठ परिसरातून धुराचे लोट निघताना दिसत आहेत. याशिवाय इराणच्या जंजान प्रांतातील निवासी भागांवरही हल्ले झाल्याचे वृत्त असून, यामध्ये काही नागरिकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी या हल्ल्याचा निषेध करताना म्हटले आहे की, इराण आपल्या सार्वभौमत्वावर आणि शैक्षणिक संस्थांवर झालेला हा आघात सहन करणार नाही. “जर आमच्या देशाच्या पायाभूत सुविधांना किंवा नागरी भागांना पुन्हा लक्ष्य केले गेले, तर आमचे प्रत्युत्तर हे शत्रूच्या कल्पनेपलीकडे असेल,” असे त्यांनी सांगितले. इराणने यापूर्वीच आखाती देशांतील अमेरिकन तळांवर आणि इस्रायलच्या महत्त्वाच्या ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ले करण्याची धमकी दिली आहे.
Comments are closed.