Iran War – खामेनी, खामेनी आणि मुजतबा…; तेहराणमध्ये इमारतीवर लावलेल्या बॅनरमधून अमेरिका-इस्रायलला सूचक इशारा
इराणची राजधानी तेहरानमधील अत्यंत वर्दळीच्या आणि प्रसिद्ध वली-ए-असर चौकात लावण्यात आलेल्या एका भव्य पोस्टरने सध्या जागतिक राजकारणाचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टरमध्ये इराणचे संस्थापक अयातुल्ला खोमेनी, विद्यमान सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी आणि त्यांचे पुत्र मुजतबा खोमेनी या तिघांची चित्रे एकत्र झळकली आहेत. इराणमधील सर्वोच्च सत्तेच्या वारसाहक्काबाबत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना या पोस्टरमुळे आता अधिक बळकटी मिळाली आहे.
सामान्यतः या चौकातील भिंतींवर इराणच्या इस्लामिक क्रांतीशी संबंधित किंवा धार्मिक संदेश देणारी चित्रे लावली जातात. मात्र पहिल्यांदाच अशा प्रकारे सत्तेतील तीन पिढ्यांचे चित्रण एकाच चौकटीत करण्यात आले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांच्यानंतर सत्तेची सूत्रे कोणाकडे जाणार, हा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचा मानला जात होता. मात्र आता अधिकृतपणे ही सूत्रे मुजतबा खोमेनी यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत.
दरम्यान, हे बॅनर ज्या वली-ए-असर चौकात लावण्यात आले आहे, तो जगभरात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी वली-ए-असर मशीदही आहे. ज्या परिसरात हे सर्व आहे, त्याला वली-ए-असर स्ट्रीट म्हटले जाते. हा रस्ता १७.२ किलोमीटरपेक्षाही जास्त लांब असून, तो सखल भागापासून थेट डोंगराळ भागापर्यंत पसरलेला आहे. या रस्त्याचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीतही समावेश करण्यात आला आहे. या ठिकाणी अनेक शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल, सिनेमा हॉल आणि सरकारी इमारती आहेत.
वली-ए-असर चौकात अनेकदा मोठे पोस्टर्स आणि बॅनर्स लावले जातात. हे ठिकाण तेहरानमधील एक प्रमुख राजकीय आणि सार्वजनिक केंद्र आहे. त्यामुळे येथे मोठ्या आकाराचे पोस्टर्स, राजकारण्यांची चित्रे आणि महत्त्वाचे संदेश असलेले होर्डिंग्स सामान्यतः पाहायला मिळतात.
Comments are closed.