तेजश्वी यादव यांच्यावर कमिशनवर आरोप आहेत

मतदारयादीतून नाव वगळल्याचा दावा ठरला फोल

वृत्तसंस्था/ पाटणा

बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी शनिवारी पाटणा येथे पत्रकार परिषदेत धक्कादायक दावा करत निवडणूक आयोगावर अनेक आरोप केले. नवीन मतदारयादीतून आपले नाव वगळण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, प्रत्यक्षात यादीमध्ये त्यांचे नाव असल्यामुळे तेजस्वी यादव तोंडघशी पडले आहेत. निवडणूक आयोगाने त्यांचे नाव यादीत असल्याचे निदर्शनास आणून देत प्रत्यक्ष पुरावाच सादर केला आहे. तनंतर विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी तेजस्वी यादव यांना सोशल मीडियावर ‘ट्रोल’ केले आहे.

मतदार यादीतून आपले आणि पत्नीचे नाव वगळल्याचा दावा तेजस्वी यादव यांनी पत्रकार परिषदेत केला होता. ‘बीएलओ घरी आले, पडताळणी केली, तरीही माझे नाव मतदार यादीतून गायब आहे.’ असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. माझे नावच यादीत नसेल तर माझ्या पत्नीचे नाव तरी कसे असेल? असा प्रश्नही मांडला. तथापि, तेजस्वी यांचे नाव यादीत 416 व्या क्रमांकावर, तर पत्नी राजश्री यांचे नाव 445 व्या क्रमांकावर असल्याचे पाहणीत स्पष्ट झाले आहे.

क्रीनवर ‘नो रेकॉर्ड्स फाउंड’ असा संदेश

पत्रकार परिषदेत तेजस्वी यादव यांनी आपला वोटर आयडी क्रमांक दाखवत ऑन-क्रीन प्रक्रिया शेअर केली. ते म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर त्यांचे नाव शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा क्रीनवर ‘नो रेकॉर्ड्स फाउंड’ लिहिले होते. तेजस्वी यांनी याला ‘निवडणूक आयोगाची लक्ष्यित कारवाई’ असे संबोधत या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचे सांगितले.

निवडणूक आयोगाने दाखविला ‘आरसा’

तेजस्वी यादव यांच्या दाव्यानंतर पाटण्याच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी हा दावा फेटाळून लावला. तेजस्वी यादव यांच्या आरोपांवर पाटण्याचे जिल्हा दंडाधिकारी एस. एन. त्यागराजन यांनी लगेच प्रतिक्रिया दिली. तेजस्वी यांचे नाव मतदार यादीत नोंदलेले आहे आणि माध्यमांमध्ये सुरू असलेल्या गोष्टी तथ्यात्मकदृष्ट्या चुकीच्या आहेत. तेजस्वी यादव यांचे नाव मतदान केंद्र क्रमांक 204, बिहार पशु विज्ञान विद्यापीठाच्या ग्रंथालय इमारतीतील अनुक्रमांक 416 येथे नोंदणीकृत आहे. पूर्वी त्यांचे नाव मतदान केंद्र क्रमांक 171 वर होते, जे अपडेट केले गेले असल्याचे निदर्शनास आणून दिले. निवडणूक कार्यालयाने बूथ यादीची एक प्रत देखील शेअर केली असून त्यामध्ये तेजस्वी यादव यांचे चित्र आणि नाव स्पष्टपणे दिसत आहे.

65 लाख नावे वगळण्याबाबत गंभीर प्रश्न

तेजस्वी यादव यांनी केवळ त्यांच्या नावाबद्दलच बोलले नाही तर राज्यभरातून 65 लाख नावे वगळण्याबाबत निवडणूक आयोगाच्या हेतूंवरही प्रश्न उपस्थित केले. निवडणूक आयोगाने इतकी नावे आणि का वगळण्यात आली हे सांगितले नाही. प्रत्येक मतदारसंघातून सरासरी 20 ते 30 हजार नावे काढून टाकण्यात आली आहेत. वगळलेल्या नावांपैकी कोण स्थलांतरित झाले, कोण मृत आहे आणि कोणाचे नाव डुप्लिकेट आहे, याविषयीची माहितीही आयोगाकडून उपलब्ध होत नसल्याबद्दल तेजस्वी यादव यांनी शंका उपस्थित केली. निवडणूक आयोगाकडे लपवण्यासाठी काही नसेल, तर त्यांनी बूथनिहाय डेटा सार्वजनिक करावा. तसेच नावे वगळण्याचे कारण दिले पाहिजे, असेही ते पुढे म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाकडून हस्तक्षेपाची मागणी

तेजस्वी यादव यांनी सर्वोच्च न्यायालयाला या प्रकरणाची स्वत:हून दखल घेण्याची मागणी केली. ‘ही केवळ तांत्रिक साफसफाई नाही तर एक सुनियोजित राजकीय हेराफेरी आहे’, असा आरोप करत तेजस्वी यादव यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार गुप्ता यांच्यावर थेट हल्ला चढवला. ‘जर तुम्ही पारदर्शक असाल तर सर्वकाही समोर आणा, अन्यथा निवडणूक आयोगावरील विश्वास तुटेल.’ असेही ते पुढे म्हणाले.

 

Comments are closed.