तेजप्रताप यांना माझे आशीर्वाद आहेत : लालू प्रसाद

आता परिवारासोबतच राहणार : दही-चूडा भोज कार्यक्रमात घेतला भाग

वृत्तसंस्था/ पाटणा

मकर संक्रांतिनिमित्त तेजप्रताप यादव यांच्या निवासस्थानी आयोजित दही-चूडा भोज कार्यक्रमात राजकारणापेक्षा अधिक चर्चा परिवारावरून झाली आहे. 7 महिन्यांनी तेजप्रताप यांच्या निवासस्थानी पोहोचलेले राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी पुत्र तेजप्रताप यांच्यावर नाराज नाही आणि माझा आशीर्वाद नेहमीच त्याच्यासोबत राहणार असल्याचे स्पष्ट पेले आहे. लालूप्रसाद यांच्या या वक्तव्याला तेजप्रताप यांची राजकीय आणि पारिवारिक वापसी म्हणून पाहिले जात आहे.

परिवारात मतभेद होत राहतात, परंतु याचा अर्थ ते वेगळे होतात असा नसतो. तेजप्रताप आता परिवारासोबतच राहणार असल्याचे लालूप्रसादांनी यावेळी म्हटले आहे. तेजप्रताप हे पक्ष आणि परिवारापासून वेगळे एकाकी पडले असल्याची चर्चा सुरु असताना लालूप्रसाद यादवांनी ही भूमिका मांडली आहे.

तेजप्रतापला माझा आशीर्वाद मिळत राहणार आहे. तो जेथे राहिल, तेथे आनंदी आणि यशस्वी ठरावा, हीच माझी कामना असल्याचे उद्गार लालूप्रसाद यांनी तेजप्रताप यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेसंबंधी बोलताना काढले आहेत. लालूप्रसादांच्या या वक्तव्याकडे राजकीय संकेतांपेक्षा अधिक भावनात्मक संदेश म्हणून पाहिले जातेय, ज्यातुन परिवाराच्या स्तरावर संबंधांमध्ये नरमाई आल्याचे स्पष्ट होते.

तेजप्रताप यांच्या दही-चूडा भोजमध्ये अनेक राजकीय नेतेही उपस्थित राहिले. राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, साधू यादव, प्रभुनाथ यादव आणि चेतन आनंद यांच्या उपस्थितीने या आयोजनाला विशेष स्वरुप प्राप्त झाले. खासकरून साधू यादव यांची हजेरी चर्चेत राहिली, कारण भूतकाळात साधू यादव आणि तेजप्रताप यांचे संबंध कटू राहिले आहेत. परंतु या आयोजनात तेजस्वी यादव आणि राबडी देवी यांची अनुपस्थिती देखील चर्चेचा विषय ठरली आहे.

परिवाराला जोडण्याचा प्रयत्न

लालूप्रसाद यादव हे परिवाराला जोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मानणे आहे. दही-चूडा भोज माझ्याकडुन परंपरा आणि नातेसंबंध निभावण्याच प्रयत्न आहे. मी सर्व मोठे नेते आणि कुटुंबीयांचा सन्मान करतो आणि हीच माझ्या राजकारणाची ओळख असल्याचा दावा तेजप्रताप यांनी केला आहे.

Comments are closed.