चालत्या बाईकवर जावयाचा सासूवर हल्ला, हेल्मेट डोक्यात घालून संपवलं, हृदयविकाराचा बनाव रचला

तेलंगणा क्राईम न्यूज : कौटुंबिक नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत थरारक आणि धक्कादायक घटना तेलंगणा राज्यातील करीमनगर जिल्ह्यातून समोर आली आहे. येथे एका 28 वर्षीय नराधम जावयाने आपल्या सासूचा चालत्या बाईकवर हेलमेटने डोक्यात प्रहार करून क्रूरपणे खून केला. या खळबळजनक घटनेनंतर आरोपीने पोलिसांना आणि कुटुंबीयांना दिशाभूल करण्यासाठी सासूचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने बाईकवरून पडल्यामुळे झाल्याचा बनाव रचला होता.

मात्र, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हा अपघात नसून थंड डोक्याने केलेला खून असल्याचे उघड झालं. या घटनेतील मृत महिलेची ओळख अरुणा असे असून, आरोपी जावयाचे नाव स्नेहित (वय 28वर्षे) आहे. स्नेहितने काही काळापूर्वी अरुणा यांची मुलगी कविता हिच्यासोबत प्रेमविवाह केला होता.

Telangana Crime CCTV Footage : चालत्या बाईकवर हेलमेटने वार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 एप्रिल रोजी आरोपी स्नेहित हा आपली सासू अरुणा यांना बाईकवर मागे बसवून कुठेतरी घेऊन जात होता. बाईक चालवत असतानाच स्नेहितने अचानक आपल्या डोक्यातील हेल्मेट काढले आणि मागे बसलेल्या सासू अरुणा यांच्या डोक्यात अत्यंत जोराने मारले. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे अरुणा यांचा बाईकवरील समतोल सुटला आणि त्या चालत्या गाडीवरून थेट रस्त्यावर कोसळल्या.

Karimnagar Crime Investigation : रुग्णालयात मृत्यू आणि जावयाचा बनाव

रस्त्यावर कोसळल्यामुळे अरुणा यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

सासूचा मृत्यू झाल्यानंतर आरोपी स्नेहितने आपल्या गुन्ह्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याने नातेवाईकांना आणि शेजाऱ्यांना सांगितलं की, अरुणा यांना बाईकवर असताना अचानक फिट्स आली आणि त्या चक्कर येऊन खाली पडल्या. सुरुवातीला सर्वांनी त्याच्या या सांगण्यावर विश्वास ठेवला.

Telangana Police Case : सीसीटीव्हीमुळे सत्य आले समोर

घटना संशयास्पद वाटल्यामुळे पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील आणि रस्त्यावरील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेज पाहताच पोलिसांना मोठा धक्का बसला. फुटेजमध्ये स्नेहित स्वतःहून चालत्या गाडीवर मागे हात करून सासूच्या डोक्यात हेलमेटने मारताना स्पष्टपणे दिसत होता. यामुळे हा अपघात नसून एक पूर्वनियोजित हत्या (Pre planned Crime) असल्याचं सिद्ध झालं.

Son In Law Arrested : पत्नीनेच पतीविरोधात दिली तक्रार

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज समोर आणून सत्य उघड केल्यानंतर मृत अरुणा यांची मुलगी आणि आरोपीची पत्नी कविता हिने स्वतः आपल्या पतीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. आईच्या हत्येचा गुन्हा उघडकीस आल्यानंतर कविताला मोठा धक्का बसला आहे.

पोलिसांनी आरोपी स्नेहितविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. या हत्येमागील नेमकं कारण काय होते, जावयाचा सासूसोबत काय वाद होते, याचा तपास पोलीस करत आहेत.

ही बातमी वाचा:

Comments are closed.